आरोग्य विभागाने नागरिकांना चांगली सेवा द्यावी..

आरोग्य विभागाने नागरिकांना चांगली सेवा द्यावी Ø जिल्हाधिकारी विनय गौडा आरोग्य विभागाने नागरिकांना चांगली सेवा द्यावी

Ø जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या सूचनायांच्या सूचना

चंद्रपूर, दि. 15 : नागरिकांच्या आरोग्याला जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. विभागाने आपल्याकडे असलेल्या उपलब्ध साधनसामुग्री तसेच मनुष्यबळाद्वारे नागरिकांना चांगल्यात चांगली आरोग्य सेवा कशी देता येईल, यादृष्टीने काम करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

 

नियोजन सभागृहात आरोग्य विभागाचा आढावा घेतांना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.

 

आरोग्य विभागात कशाची कमतरता आहे, त्याची तपासणी करावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून एकत्रितपणे नियोजन करावे. तसेच आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण व क्षमता वाढ करण्यावर भर द्यावा. आरोग्य सेवेतील वाहनचालक व सफाई कर्मचाऱ्यांची पदे बाह्यस्रोतून भरण्याची तरतूद आहे. तसेच नियमित मनुष्यबळ, आवश्यक साहित्य मिळण्यासाठी तसेच रुग्णवाहिकेमध्ये लाईफ सपोर्ट सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव करावा.

 

स्त्री रूग्णालयात कोविड कालावधीत प्राप्त व आता तेथे वापरात नसलेले अतिरिक्त साहित्य जिल्हा शासकीय रूग्णालयाकडे हस्तांतरीत करून त्याचा वापर करावा. सर्व इमारतीचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट व इलेक्ट्रीकल ऑडीट पूर्ण करून घेण्याचे व तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात ना – हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ग्रामीण व शहरी भागात डेंग्यू, मलेरिया व हत्तीरोग आजार वाढू नये, यासाठी डास उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे व यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आरोग्य विभागाला दिले.

बैठकीला आरोग्य विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.