खरेदी केंद्रांना शेतकरी नोंदणी करण्याची मंजुरी

खरेदी केंद्रांना शेतकरी नोंदणी करण्याची मंजुरी

भंडारा, दि. 10 : नवीन संस्था व केंद्र निवड समितीत झालेल्या ठरावानुसार जिल्ह्यात मागील पणन हंगामात काम करणाऱ्या 183 खरेदी केंद्र व नवीन 50 खरेदी केंद्र असे 233 खरेदी केंद्रांना शेतकरी नोंदणी करण्यासाठी मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

 

ज्या संस्थांनी धान खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार व अनियमितता केली आहे अशा 20 खरेदी केंद्रांची मान्यता रद्द केलेली आहे. मागील पणन हंगामात तक्रारी, अनियमिता चौकशी दरम्यान आढळून आलेल्या संबंधित संस्थांवर प्रत्येकी 1 लाख रूपये दंड आकारण्यात आलेला आहे व दंडाची पुर्तता लवकरात लवकर केल्यानंतर संबंधित संस्था धान खरेदीसाठी सुरू करण्यात येतील.

 

चालू हंगामात नवीन प्रस्ताव सादर केलेल्या संस्थांपैकी 50 नवीन खरेदी संस्थांना मान्यता देण्यात आली आहे. मंजूर 233 खरेदी केंद्रापैकी 78 खरेदी केंद्रांवर कुठलीही अनियमितता नसल्यामुळे 78 खरेदी केंद्रांना शेतकरी नोंदणी करण्याची मंजुरी 11 नोव्हेंबर 2022 पासून देण्यात येत आहे. शासनाने शेतकरी नोंदणी करिता मुदतवाढ दिली असून सदर मुदत 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी केंद्रावर जावून आपले नाव नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हा पणन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.