मुंबई शहर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध – जिल्हाधिकारी राजीव निवतकर/१२ आणि १३ नोव्हेंबर रोजी दिव्यांग आणि महिलांसाठी विशेष मोहीम

मुंबई शहर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध – जिल्हाधिकारी राजीव निवतकर

१२ आणि १३ नोव्हेंबर रोजी दिव्यांग आणि महिलांसाठी विशेष मोहीम

मुंबई, दि. ९ : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार आज ९ नोव्हेंबर रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून येत्या १२ व १३ नोव्हेंबर रोजी दिव्यांग व महिलांसाठी विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.

आज प्रसिद्ध झालेली मतदार यादी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात अवलोकनार्थ उपलब्ध असेल. यासंदर्भात दावे व हरकती दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. तर दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्याण पांढरे उपस्थित होते.

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेअंतर्गत दि.१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिव्यांग आणि महिलांसाठी तसेच दि.२६ व २७ नोव्हेंबर, २०२२ रोजी तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तींची नाव नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार असून भटक्या व विमुक्त जमातींच्या नागरिकांकडे वय व रहिवासाचा पुरावा नसल्यास स्वयंघोषणा पत्र घेतले जाईल.

जिल्ह्यातील पदनिर्देशित ठिकाणी सर्व मतदारांसाठी १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ तसेच ३ आणि ४ डिसेंबर २०२२ रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नवीन मतदार नोंदणीअंतर्गत १ जानेवारी २०२३ रोजी १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या नागरिकांची नोंदणी करण्यात येणार असून ज्या नागरिकांचे वय दि. १ एप्रिल, दि. १ जुलै तसेच दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी १८ वर्षे पूर्ण होणार आहे, त्यांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.

नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना क्र. ६, मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७, नाव दुरूस्तीसाठी नमुना क्र. ८, परदेशस्थ भारतीयांसाठी नमुना क्र. ६ अ तसेच आधार नोंदणीसाठी नमुना क्र. ६ ब चा उपयोग करता येईल. तर, ऑनलाईन नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी, यासाठी जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.