मंडईच्या गर्दीत होणाऱ्या बालविवाहांवर प्रशासनाची नजर

मंडईच्या गर्दीत होणाऱ्या बालविवाहांवर प्रशासनाची नजर

भंडारा, दि. 9 : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मंडई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या मंडई निमित्ताने जमा होणान्या गर्दीच्या फायदा घेत काही पालक आपल्या अल्पवयीन मुलांचे बालविवाह पार पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. विवाह करिता वधूचे वय 18 वर्षे पूर्ण तर वराचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तरीही लग्ना करिता निर्धारित असलेले वय पूर्ण न करताच पालक आपल्या मुलांची लग्न मंडईच्या गर्दीत पार पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. बालविवाह संदर्भातील प्रकरणाची माहिती तत्काळ जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा बाल संरक्षण कायदा महिला व बालविकास विभागास देण्यात यावी. असे आवाहन महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार अठरा वर्षाखालील मुलगी व एकवीस वर्षाखालील मुलगा यांचा विवाह करणे व त्यासाठी सहकार्य करणे हा गुन्हा असून त्यामध्ये कारावास व एक लाख रुपये दंड अशी तरतूद आहे. बालविवाह करणान्या मंडळी सोबतच लग्नाला उपस्थित असलेले वराडी बालविवाह सहाय्य करणाऱ्यांमध्ये मंडप डेकोरेशन, लग्नविधी पार पाडणारे भटजी, पत्रिका छपाई करणारे प्रिंटिंग प्रेस फोटोग्राफर व इतर उपस्थित संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यास महिला व बालविकास विभागात संपर्क साधावा तसेच विभागाच्या चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक 1008 या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल. जिल्ह्यात नोव्हेंबर मध्ये पहिल्या आठवड्यात एकूण दोन बालविवाहाची प्रकरणे समोर आली. एका प्रकरणात नवरदेवाचे आई-वडील यांचे विरुद्ध गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. तर पोलीस स्टेशन कारधा क्षेत्रातील होत असलेले बालविवाह प्रतिबंध करण्यास यश आले आहे.

 

शासनाच्या अधिसूचनेनुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची बालविवाह प्रतिका सहाय्यक म्हणून नियुक्ती शहरी भागासाठी करण्यात आली आहे. ग्राम स्तरावर ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका यांना त्यांचे सहाय्य करीता जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध करण्याकरीता सर्व यंत्रणांना जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

 

बालविवाह प्रतिबंध करण्याकरिता पोलीस स्टेशन कारधाचे पोलीस निरीक्षक राजेश थोरात, पोलीस कर्मचारी गिरीश बोरकर, श्रीमती रेखा मेश्राम, अल्फा डहारे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे, सामाजिक कार्यकर्ता सवीता सोनकुसरे, क्षेत्रीय कार्यकर्ते जयश्री मेश्राम व सुधीर सरादे तसेच गावातील ग्रामसेवक यांचे सहकार्य मिळाले. जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा व परिविक्षा अधिकारी प्रियंका पशिने यांचे कायदेविषयक सहकार्य प्राप्त झाले. संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य शिल्पा वंजारी, अजित नागोसे, निलय बैदवार, डिम्पल बडवाईक यांचे सहकार्य लाभले.