महानगरपालिकेतर्फे स्वच्छता स्पर्धेसंबंधी कार्यशाळा संपन्न

0

महानगरपालिकेतर्फे स्वच्छता स्पर्धेसंबंधी कार्यशाळा संपन्न

३३ गट सहभागी,२ नोव्हेंबर भाग घेण्याची अंतिम तारीख

स्वच्छतेत लोकसहभागाचा उद्देश

चंद्रपूर १ नोव्हेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग ” स्पर्धेसंबंधी कार्यशाळा ३१ ऑक्टोबर रोजी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मनपा राणी हिराई सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ” माझ्या शहरासाठी माझे योगदान ” या थीमवर ही वार्डस्तरीय स्पर्धा सुरु होत आहे. सदर स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख २ नोव्हेंबर असुन कमीत कमी २५ नागरीकांचा सहभाग असणारा १ गट याप्रमाणे ३३ गट स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

स्पर्धेत सामील गटांना सौंदर्यीकरणासाठी पेंटींग करतांना कुठले चित्र असावे, रंगाचा वापर कसा करावा,प्लास्टीक किंवा इतर टाकाऊ वस्तुंपासून कुठल्या विविध टिकाऊ वस्तू बनविता येऊ शकतात,गाडीच्या खराब टायर्स पासुनही विविध कलाकृती कश्या तयार करावयाच्या यासंबंधी मार्गदर्शन तसेच स्पर्धेचे नियम,अटी व इतर आवश्यक बाबींवर चर्चा सदर कार्यशाळेत करण्यात आली.

स्वच्छता मोहीमेत लोकसहभाग वाढावा या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन स्पर्धा असल्याने सौंदर्यीकरण करतांना काय नाविन्यपूर्ण गोष्टी करत येऊ शकतात यावर सर्व गटांचे लक्ष आहे. ६ ते ७ नोव्हेंबर दरम्यान मनपातर्फे सौंदर्यीकरण करण्यास झाडे व पेंटिंग कलर (मर्यादित) पुरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी गुणांकन पद्धत निश्चित करण्यात आली असुन कामाच्या तासांवर तसेच कामात दररोज किती व्यक्ती सहभागी होतात यावर त्रयस्थ निरीक्षकांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यास काही स्थळ मनपातर्फे देण्यात आले असुन याव्यतिरिक्त इतर स्थळ जसे शहरातील मुख्य चौक, रस्ता दुभाजक, बगीचा, सार्वजनिक ठिकाणे या जागा गटांनी निवडल्या असुन सदर जागांची पाहणी मनपातर्फे करण्यात येत आहे.

याप्रसंगी सेंट्रल इन्स्टिट्यु ऑफ प्लास्टिक इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ (सिपेट) तर्फे शरद पिटी,सोनाली यांनी प्लास्टिकद्वारे बनविता येणाऱ्या वस्तू व टाकाऊपासून टिकाऊ यासंबंधी पावर पॉईंटद्वारे सादरीकरण केले.कार्यशाळेस उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील, स्वच्छतेच्या ब्रँड अँबेसेडर उषा बुक्कावार,साक्षी कार्लेकर, पदाधिकारी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here