प्रभागातील वॉर्डसभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  – विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२२

प्रभागातील वॉर्डसभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

– विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२२

चंद्रपूर, ता. २२ : विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२२ अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने तुकुम प्रभागातील पंडित दीनदयाल प्राथमिक शाळा येथे सोमवार दिनांक २२ नोव्हेंबरला आयोजित विशेष वॉर्डसभेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. यावेळी अनेक प्रभागातील अनेक नवमतदार आणि नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी सभेत हजेरी लावली. 
 
सभेला मार्गदर्शन करण्यासाठी मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील, शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत, प्रभारी सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे, प्रभारी सहायक आयुक्त सचिन माकोडे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
 
उपायुक्त अशोक गराटे यांनी उपस्थित नागरिकांना मतदानाचे महत्व विस्ताराने पटवून देत मतदार नोंदणीचे आवाहन केले. त्यानंतर सुभाष कासनगोट्टूवार आणि सहायक आयुक्त विद्या पाटील यांनी देखील नागरिकांना मतदार नोंदणीचे आवाहन केले. यावेळी सभास्थानी क्रमांक ४१ ते ५३ च्या मतदान केंद्रांचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकरवी नागरिकांनी मतदार नोंदणी तसेच नाव तपासणी आदी सेवांचा लाभ घेतला. दिनांक २७ व २८ नोव्हेंबरला असलेल्या विशेष शिबिराबद्दल देखील नागरिकांना सांगण्यात आले तसेच सदर शिबिराला उपस्थिती लावण्याचे आवाहन उपस्थित मनपा अधिकारी व नगरसेवक यांनी केले.