संपूर्ण जिल्ह्यात कलम 37 (1) (3) लागू

संपूर्ण जिल्ह्यात कलम 37 (1) (3) लागू

भंडारा, दि. 15 : कोरोनाचा प्रादुर्भाव व दिवाळी नंतर ग्रामीण भागात मंडई/ दंडारी कार्यक्रमाचे आयोजन, एस. टी. महामंडळाचे राज्यव्यापी संप व 19 नोव्हेंबर 2021 रोजी डी. एल. एड परीक्षा होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्ह्यात 15 ते 28 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) लागू करण्यात आले आहे.

याअंतर्गत पुढीलप्रमाणे निर्बंध लावण्यात आले असून यात शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येईल, अशी कोणतीही वस्तु सोबत ठेवणे. कोणताही दाहक पदार्थ व स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे, तयार करणे, व्यक्तिंचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा प्रतिमा त्यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे, हावभाव करणे, सोंग करणे किंवा अशी चित्रे, चिन्हे, फलके किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा जनतेत त्यांचा प्रसार करणे, अशा विविध बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहे. तसेच या अंतर्गत संपूर्ण भंडारा जिल्ह्यात पाच किंवा अधिक व्यक्ती रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी महेश पाटील यांच्या आदेशात नमुद आहे.