महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती करणे ही काळाची गरज – कविता बि.अग्रवाल

महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती करणे ही काळाची गरज – कविता बि.अग्रवाल

चंद्रपूर दि. 13 नोव्हेंबर: महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती आणि त्यांना विधी सहाय्य सेवा प्राप्ती ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता बि. अग्रवाल यांनी केले.

आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन भवन, चंद्रपूर येथे आयोजित महिला विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय सेवा योजना महामेळाव्यात मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश श्री. केदार, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक वनिता घुमे, ताडोबा प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी श्री. भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) श्री.शिंदे, मनपाचे सहाय्यक आयुक्त सचिन माकोडे, जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. अभय पाचपोर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक व सहकारी डॉक्टर्स, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच महिला बचत गटांचे प्रतिनिधी व लाभार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

श्रीमती अग्रवाल पुढे म्हणाल्या, आजादी का अमृत महोत्सव हा केंद्र व राज्य शासनाचा तसेच सर्व शासकीय विभागांचा महत्त्वपूर्ण अभियान आहे. त्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एक घटक आहे. या अभियानाअंतर्गत 2 ऑक्टोबर पासून विविध विधी सेवा जनजागृती कार्यक्रम, घरोघरी संपर्क, विविध शहरे, गाव, वाडी-वस्ती, दुर्गम भाग तसेच प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा हा कार्यक्रम आहे. त्यानिमित्त या महिला महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

एकूण लोकसंख्येमध्ये सुमारे 50 टक्के घटक असलेल्या महिलांना यानिमित्त विविध कायदे विषयक तरतुदींची, महिला बचत गटांना उपलब्ध नवीन संधींची, मला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला व नागरिकांना सुरक्षेसाठी सौर कुंपण याबाबत सविस्तर माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. या महामेळाव्यानिमित्त जिल्हा प्राधिकरणाच्या सभागृहामध्ये भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले असून त्यामध्ये कान नाक घसा ब्लड प्रेशर आणि प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरची तपासणी वैद्यकीय महाविद्यालय आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहयोगाने करण्यात येत आहे.

राज्य महिला आयोगाच्या समन्वयक वनिता घुमे यांनी याप्रसंगी आयोगाद्वारे राबविण्यात येणारे विविध जनजागृती कार्यक्रम तसेच सुविधांबाबत माहिती दिली.  आयोजित विधी सेवा महाशिबीर, स्टॉल प्रदर्शन आणि वैद्यकीय तपासणी शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमानिमित्त विविध शासकीय विभाग , स्वयंसेवी संस्था व महिला बचत गट यांच्यामार्फत स्टॉल उभारण्यात आले होते. त्या माध्यमातून विविध विभागांच्या योजनांची माहिती देण्यात आली.