मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकसहभाग वाढावा : उपायुक्त अशोक गराटे

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकसहभाग वाढावा : उपायुक्त अशोक गराटे

2022 मध्ये चंद्रपूर महानगर पालिकेची निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने मतदार जागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. नवमतदार, लग्न होवून बाहेरगावी गेलेल्या महिलांना यादीतून वगळणे तसेच लग्न होवून शहरात आलेल्या महिलांची नोंदणी करणे, दिव्यांग मतदारांची नोंदणी प्राधान्याने करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकसहभागातून मोहिम यशस्वी करा, असे आवाहन मनपाचे उपायुक्त अशोक गराटे यांनी मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ)  यांना केले.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये 1 जानेवारी, 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनर्रीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार 1 नोव्हेंबर या कालावधीत नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू होत आहे. ज्यांची वयाची 18 वर्ष 1 जानेवारी 2022 रोजी पुर्ण होत आहेत, अशा सर्व नागरिकांनी नमुना 6 चा नवीन मतदार नोंदणीचा फार्म भरून आपल्या मतदान केंद्रावर मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, घर टॅक्स पावती तसेच इतर संपूर्ण कागदपत्रे जोडून जमा करावे, तसेच मैयत, स्थलांतरीत, विवाहित असल्यास फार्म 7 भरावे, दुरुस्ती करण्यासाठी फार्म 8 भरून घ्यावे, असे आवाहन उपायुक्त अशोक गराटे यांनी केले.