आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहामध्ये जनजागृती शिबिराचे आयोजन

आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

जिल्हा कारागृहामध्ये जनजागृती शिबिराचे आयोजन

चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा कारागृह, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. आजादी का अमृतमहोत्सव हा केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा व्यापक असा कार्यक्रम आहे. त्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हा एक घटक आहे. त्यामुळे या महोत्सवाच्या निमित्ताने सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री.जाधव यांनी केले.

त्यासोबतच दिव्यांग व्यक्तीसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना व त्यांची माहिती सर्व नागरिकांपर्यंत तसेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची नितांत गरज असल्याचे श्री. जाधव म्हणाले.

या उपक्रमामध्ये व्यक्तींना उपलब्ध विधी सेवा सुविधांबाबत माहिती, तसेच कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या खबरदारी विषयक माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधीक्षक  रवींद्र जगताप यांनी उपस्थितांना सर्वोच्च न्यायालयाने “सोनधर विरुद्ध छत्तीसगड शासन” या प्रकरणामधील दिलेल्या निर्देशांची सविस्तर माहिती दिली व ती जास्तीत जास्त लाभार्थी तसेच नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. त्यासोबतच महाराष्ट्र  प्रिझन रेमिशन रुल्स बाबत सविस्तर मार्गदर्शन करत त्यातील तरतुदींची मुद्देसूद माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा कारागृहाचे अधिकारी,कर्मचारी व कारागृह बंदी उपस्थित होते.