स्वाभिमानी शेतकर्‍यांची दिवाळी, केंद्रीय मंत्र्यांच्या दारी

तुपकरांच्या नेतृत्वात  कार्यकर्ते उपराजधानीत धडकले

नागपूर-   संविधान चौकात पणत्या पेटवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांच्या आंदोलनात्मक दिवाळीचा आरंभ केला तो, केंद्रीय मंत्र्यांच्या दारी धडक देण्याचा संकल्प घेऊन. अचानक संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते संविधान चौकात दाखल झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी विधेयकाचा विरोध आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मदत मिळावी, या दोन प्रमुख मागण्या घेऊन उपराजधानीत महाराष्ट्रातील पहिला दिवाळीचा आंदोलनात्मक फटाका फोडण्यात आला. हा मोर्चा नितीन गडकरी यांच्या निवासाकडे आगेकुच करत असतांना, मध्येच पोलिसांनी अडवून तुपकरांसह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली.

‘शेतकर्‍यांची दिवाळी नितीन गडकरी यांच्या दारी’ हा नारा तसेच ‘गडकरी साहेब, मोदी साहेबांना शेतकर्‍यांना मदत द्यायला सांगा हो !’ हे आर्जव घेऊन संविधान चौकात सकाळी 8 वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली. शेतकर्‍यांना किमान 35 हजार रूपये नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र सरकारने भरीव पॅकेज घोषित करावे, हमीभावाने कापूस खरेदी करण्यासाठी तालुका सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे, सोयाबीनचा प्रतिक्विंटल किमान 6 हजार रुपये हमीभाव स्थिर करण्यासाठी केंद्राने धोरण आखावे, पीक विमा कंपन्यांना शेतकर्‍यांना विमा देण्यासाठी केंद्र सरकारने बाध्य करावे व केंद्राने आणलेले कृषी विधेयक हे रद्द करावे, या प‘मुख मागण्या घेऊन रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात या आंदोलनाचा आरंभ झाला. यावेळी नागपूर जिल्ह्याचे पदाधिकारी दयाल राऊत व संकेत दुरुगकर यांच्या समवेत विदर्भातील विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रामु‘याने उपस्थित होते. आपला लढा कुणा व्यक्ती विरोधात किंवा प्रशासना विरोधात नसून व्यवस्थेविरोधात असल्यामुळे त्याला पोलिसांनीही सहकार्य करण्याचे आवाहन आरंभीच तुपकर यांनी केले होते.

घोषणा देत देत ही रॅली नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे आगेकूच करत असतांना मधेच स्वाभिमानी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये चांगलीच हुज्जत व थोडीफार धक्काबुक्की झाली. वातावरण चांगलेच तापले होते. आम्ही नितीन गडकरी यांच्यासाठी दिवाळीचा फराळ घेऊन चाललो असल्यामुळे आम्हाला आमच्या मागण्या त्यांच्या कानावर पोहोचविण्यासाठी जाऊ द्या, अशी भूमिका तुपकर यांनी घेतली. महाराष्ट्रात विविध पक्षांतर्फे वेगवेगळी आंदोलने सुरू असतांना त्यांना अटकाव केल्या जात नाही, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे आंदोलन सुरू असताना आम्हाला का अडवता असा प‘श्न त्यांनी उपस्थित केला. मात्र आंदोलकांना पोलिस व्हॅनमध्ये आंदोलकांना डांबून अटकेची कारवाई करण्यात आली. आंदोलनात रविकांत तुपकर यांच्यासह राणा चंदन, ज्ञानेश्वर टाले, विदर्भ प्रमुख दामोदर इंगोले, शाम अवथळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. सकाळीच 8 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाची दखल इलेक्ट्रॉनिक मीडियाने लाईव्ह घेतल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले. ‘शेतकर्‍यांची दिवाळी केंद्रीय मंत्र्यांच्या दारी’ हे आंदोलन चांगलेच आंदोलनात्मक फटाके फोडणारे ठरले.