जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा दक्षता व नियत्रंण समितीचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा दक्षता व नियत्रंण समितीचा आढावा

 

चंद्रपूर, दि. 19 ऑक्टोबर: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

 

यावेळी, पोलीस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, विधी अधिकारी अनिल तानले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1593 गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी 27 गुन्हे पोलीस तपासावर आहे. माहे एप्रिल ते सप्टेंबर 2022 पर्यंत घडलेल्या गुन्ह्यांच्या माहितीचे अहवाल मागवून घ्यावे, तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यासंदर्भात सहाय्यक अभियोक्ता यांच्याकडून अभिप्राय घ्यावा. महिन्यातून एकदा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा घ्यावी. तसेच तालुकास्तरीय समित्यांच्या नियमित बैठका घ्याव्यात.आर्थिक सहाय्यासाठी असलेली प्रलंबित प्रकरणे तातडीने मंजुरीसाठी काढावीत. बैठकीला समितीतील सर्व संबंधित सदस्यांनी प्राधान्याने उपस्थित राहावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी संबंधितांना दिल्या.

 

बैठकीत पोलीस तपासावर प्रलंबित व न्यायालयात प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी यावेळी अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियमान्वये आतापर्यंत नोंदविण्यात आलेले गुन्हे, न्यायप्रविष्ठ प्रकरणे व आर्थिक सहाय्याच्या प्रकरणाची माहिती सादर केली.