प्रलंबित गुन्ह्यांची उकल तातडीने करून गुन्ह्याचे प्रमाण जास्त असणारी ठिकाणे त्वरीत शोधा -जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी

प्रलंबित गुन्ह्यांची उकल तातडीने करून गुन्ह्याचे प्रमाण जास्त असणारी ठिकाणे त्वरीत शोधा -जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी

Ø जादूटोणा विरोधी कायदा समितीची आढावा बैठक

चंद्रपूर, दि. 19 ऑक्टोबर: पोलीस तपासावर असलेल्या जादूटोणा विरोधी प्रलंबित गुन्ह्यांची उकल तातडीने करून ज्या ठिकाणी गुन्ह्याचे प्रमाण जास्त आहे ती ठिकाणे त्वरीत शोधा, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हास्तरीय जादूटोणा विरोधी कायदा समितीची आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी, पोलीस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, विधी अधिकारी अनिल तानले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष तसेच समाजात रुजलेल्या काही अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा 2013 महाराष्ट्र शासनाने संमत केला आहे.

 

जिल्हाधिकारी श्री. गौडा जी सी पुढे म्हणाले, पोलीस तपासावर जादूटोणा प्रलंबित गुन्हे असून सदर गुन्ह्यांची माहिती तयार करून पोलीस अधीक्षकांना पाठवावी. तपास अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावी. गुन्ह्याची उकल तातडीने करून ज्या ठिकाणी गुन्ह्याचे प्रमाण जास्त आहे अशी ठिकाणे शोधून काढावीत. पोलीस विभागांनी एलसीबी विभागाला प्रत्येक वेळी माहिती द्यावी. गुन्ह्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या ठिकाणी जनजागृती करावी, अशा सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या.