थकबाकी न भरणाऱ्या १८ लाभधारकांचे नळ कनेक्शन खंडित 

थकबाकी न भरणाऱ्या १८ लाभधारकांचे नळ कनेक्शन खंडित

चंद्रपूर १६ ऑक्टोबर – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे थकीत पाणीपट्टी वसुली अंतर्गत पाणीपट्टी कर न भरणाऱ्या १८ लाभधारकांची नळ जोडणी खंडीत करण्यात आली आहे.

महानगरपालिकेचे प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत असलेली घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी पाठ फिरवणाऱ्या लाभधारकांसाठी विशेष मोहिम राबविली जात आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ करीता रू. १२.९७ कोटी थकीत मागणी व रू. ०५.४५ कोटी चालू मागणी अशी एकूण रू. १८.४३ कोटी पाणीपट्टी कराची वसुली थकीत आहे.

पाणीपट्टी कराचा भरणा करता यावा याकरिता मनपाची विविध पथके सुटीच्या दिवशीही कार्यरत आहेत.तसेच मोबाईल संदेश,ऑटो संदेश, फोन, सोशल मिडिया इत्यादी विविध माध्यमातुन तसेच प्रत्यक्ष भेटी देऊन कर भरण्याचे आवाहन केले जात आहे .

कराचा भरणा करणे सोपे जावे यासाठी मनपातर्फे सूट देण्यात असुन याअंतर्गत ३१ ऑक्टोबर पर्यंत एकमुस्त भरणा केल्यास १० टक्के तर ०१/११/२०२२ ते ३१/१२/२०२२ पर्यंत पाणी कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ % सुट देण्यात येणार आहे. यानंतरही भरणा न केल्यास नळजोडणी बंद करण्याची कारवाई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

थकीत पाणी कराचा भरणा प्रियदर्शिनी चौक पाणी टाकी येथील मनपाचे पाणी पुरवठा कार्यालय, झोन कार्यालय क्रमांक १- संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स, झोन कार्यालय क्रमांक २- कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक, झोन कार्यालय क्रमांक ३- देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प येथे स्वीकारण्यात येत आहे.

www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर सुद्धा भरणा करता येईल. शहरातील नागरिकांनी नळजोडणी बंद होऊ नये, यासाठी पाणी कर त्वरित भरण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.