राष्ट्रीय उपशामक काळजी कार्यक्रम आणि स्तन कर्करोग आठवडा साजरा

राष्ट्रीय उपशामक काळजी कार्यक्रम आणि स्तन कर्करोग आठवडा साजरा

भंडारा,दि.18:- राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम तसेच राष्ट्रीय उपशामक काळजी कार्यक्रम 9 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.एस. फारुकी उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिनेश कुथे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखील डोकरीमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन मुलतकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हा रुग्णालय भंडारा येथे राष्ट्रीय पॅलेएटिव्ह केअर कार्यक्रम ऑगस्ट 2014 पासून सुरू करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात आजपर्यंत एकूण 4 हजार 92 रुग्णांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 362 दुर्धर आजार कॅन्सर ग्रस्त रुग्णांना सेवा देण्यात आली. असे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा सल्लागार डॉ. शैलेष कुकडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मल्टी टास्क वर्कर कु. कामीनी गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा रुग्णालयातील असंसर्गजन्य रोग निदान कार्यक्रमात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहाकार्य केले.
पॅलेएटिव्ह केअर (उपशामक सेवा) म्हणजे : ज्या दृष्टीकोनामुळे रोग्याचा आणि त्याच्या कुटुंबाच्या आयुष्याचा दर्जा उंचावतो त्याला उपशामक काळजी असे म्हणतात. पॅलेएटिव्ह केअर हे वैद्यकीय शास्त्रातील एक क्षेत्र आहे. दुर्धर आजारांवर इलाज करुन रुग्णांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. वेदना व लक्षणांपासून आराम पुरविण्यासोबतच यामध्ये मानसिक वेदनांपासून मुक्ती देण्याचा प्रयत्न केला जातो.
पॅलेएटिव्ह रुग्णांसाठी पौष्टीक आहार : ताज्या भाज्या आणि फळे, ताजे लिंबू, ताक, नारळपाणी, ताजा रस, भाजलेली धान्ये, चणे आणि नट्स, चिक्की आणि तिळाचे लाडू.
स्तनाच्या कर्करोगाची सर्वसामान्य लक्षणे : स्तनाच्या आकारामध्ये बदल, बोंड आत ओढलं जाणं त्याची जागा किंवा आकार बदलणं, एक किंवा दोन्ही बोंडा मधून स्त्राव. स्तनांची त्वचा खडबडीत होणे किंवा खळया पडणे, स्तनांमध्ये गाठ किंवा स्तनाची त्वचा जाड होणे, स्तन किंवा काखेमध्ये सतत वेदना, गाठ येणे.
वरील प्रमाणे पॅलेएटिव्ह केअर व स्तन कॅन्सर आजाराची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे त्वरीत तपासणी करण्यासाठी यावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.