महिलांनी आपल्या संरक्षणासाठी असलेले कायदे व अधिकाराचा योग्य वापर करावा  – कविता बि.अग्रवाल

महिलांनी आपल्या संरक्षणासाठी असलेले कायदे व अधिकाराचा योग्य वापर करावा  – कविता बि.अग्रवाल

Ø आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भव्य विधी जनजागृती शिबिराचे आयोजन

चंद्रपूर दि. 14 ऑक्टोबर : महिलांनी समाजात वावरतांना आपल्या संरक्षणासाठी असलेले कायदे व अधिकारांचा योग्य वापर करावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता बि. अग्रवाल यांनी केले. आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा न्याय मंदिर सभागृहात आयोजित कायदेविषयक जनजागृती महिला मेळावा व पोषण आहार पाककृती प्रदर्शनी  कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा विभिन्न संघाचे अध्यक्ष ॲड अभय पाचपोर,  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक सुशील खडसान, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. जाधव, महिला व बाल विकास अधिकारी रमेश टेटे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्य महिला आयोग, केंद्रीय महिला आयोग, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती महिला मेळावा, आहार प्रदर्शनी व पथनाट्य उपक्रमाचे आयोजन जिल्हा न्यायालय येथे करण्यात आले.

आहार प्रदर्शन, पथनाट्य या माध्यमातून महिला बचतगट व अंगणवाडी सेविका प्रशंसनीय कार्य करीत आहे. असे सांगून श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, महिलांनी समाजात वावरतांना आपल्या संरक्षणासाठी असलेले कायदे व अधिकारांचा योग्य वापर करावा, महिलांसाठी असलेल्या कायद्याचा गैरवापर करू नये, यंत्रणा ही पुरेपूर मदत करेल, आपल्या कुटुंबाच्या व समाजाच्या बचावासाठी कायद्याचा वापर करणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. त्यासोबतच,श्रीमती अग्रवाल यांनी सर्व महिला व बालकांसाठी कायदेशीर जागरुकता ठेवण्याचे आवाहन करत कायद्यांचा योग्य वापर करुन पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. यावेळी ॲड. अभय पाचपोर यांनी महिलांना भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कांची जाणीव करून दिली.
यानिमित्त जिल्हा न्यायालयाच्या परिसरामध्ये स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह, हुंडा पद्धत या विषयावर जनजागृती विषयक पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. त्यासोबतच गरोदर माता व बालकांना पोषण आहाराचे महत्व कळावे, यासाठी पोषण आहार प्रदर्शनी भरविण्यात आली होती. या शिबिरामध्ये माता व बालकांना आहार संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षिका मीना गिरडकर यांनी उपस्थित महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली.याप्रसंगी उपस्थित सर्व महिलांना विविध कायदेविषयक माहिती पत्रकांचे व पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
     सदर कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. साखरकर , आभार प्रदर्शन महिला व बाल विकास अधिकारी रमेश टेटे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना राजूरकर यांनी केले.