स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा संदेश गावागावात पोहचवा – जिल्हाधिकारी गुल्हाने

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा संदेश गावागावात पोहचवा – जिल्हाधिकारी गुल्हाने

चंद्रपूर दि. 11 ऑक्टोबर : शासनाने दिलेल्या सूचनेनुसार भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2021 पासून तर 15 ऑगस्ट 2022  व त्यापुढेही सुरु राहील. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी 75 आठवड्यांचे नियोजन करून आराखडा तयार करून घ्यावा. तसेच  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा संदेश गावागावात पोहोचविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी संबधित विभाग प्रमुखांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित अमृत महोत्सवाच्या बैठकीसंदर्भात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे, नगर विकास विभागाचे अजितकुमार डोके, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी श्री. बक्षी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे नरेश उगेमुगे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यातील संबंधित सर्व विभागांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे योग्य नियोजन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आराखडा तयार करण्यात आला असून दिलेल्या दिशानिर्देशाव्यतिरिक्त इतर काही माहिती उपलब्ध असेल तर ती कळवावी. तीन महिन्यांमध्ये विभागामार्फत कोणकोणते कार्यक्रम करता येणार त्यासंबंधी नियोजन पाठवावे तसेच त्याचे डिसेंबरअखेरपर्यंतचे कॅलेंडर विभागांनी तयार करून घ्यावे, असे ते म्हणाले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमासाठी विभाग प्रमुखांचा वेगळा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात येणार असून त्यासंबंधीच्या सर्व सूचना व माहिती, ग्रुपच्या माध्यमातून विभाग प्रमुखांना देणे शक्य होईल, असेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले.