मध केंद्र योजनेकरिता अर्ज मागविले

मध केंद्र योजनेकरिता अर्ज मागविले

भंडारा, दि.11:  उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. पात्र व्यक्ती व संस्थाकडून मध केंद्र योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.

या योजनेची वैशिष्टे मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा आहे. यामध्ये वैयक्तिक मधपाळ, वैयक्तिक केंद्र चालक व केंद्रचालक संस्था असे तीन प्रमुख घटक आहेत.

वैयक्तिक मधपाळ घटकातून अर्ज करण्याकरिता अर्जदार साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य व वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. वैयक्तिक केंद्र चालक घटकातून अर्ज करण्याकरिता अर्जदार किमान 10 वी पास असावा, 21 वर्षापेक्षा जास्त वय, व्यक्तीच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थ्याकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

केंद्र चालक संस्था या घटकातून अर्ज करण्याकरिता संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे मालकीची किंवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सवेक असावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, बाबा मस्तानशहा वार्ड, जांभूळकर निवास, भंडारा दुरध्वनी क्रमांक 07184-252521 या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी. बी. देविपुत्र यांनी केले आहे.