मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

          भंडारा,दि.11:- जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना बँकेकडून सहज व सोप्या पध्दतीने अर्थसहाय्य देवून स्थानिक युवकांना स्वयंरोजगाराकडे प्रेरित करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. राज्यात ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सुक्ष्म, लघु उपक्रमाद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हात भार लावणे या योजनेचा उद्देश आहे.

            मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम योजनेची संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी Maha-cmegp.gov.in हे विशेष संकेतस्थळ अर्जदारांसाठी तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील अर्जदारांचे अर्ज अपलोड करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयात मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. तरी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजने अंतर्गत इच्छूक पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ भंडारा या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी.बी. देविपुत्र यांनी केले आहे.