जिल्ह्यात एका दिवशी विक्रमी 23 हजार लसीकरण ;जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेचे अभिनंदन

????????????????????????????????????

जिल्ह्यात एका दिवशी विक्रमी 23 हजार लसीकरण

  • रविवारी 225 केंद्रावर अभियान

  • ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित

  • जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेचे अभिनंदन

  • दुसरा डोस प्राधान्याने घ्या

भंडारा,दि.01: कोविड लसीकरणाला जिल्ह्यात गती प्राप्त झाली असून गुरूवारी जिल्हाभरात लसीकरण अभियान राबविण्यात आले. या अभियानात एका दिवशी सर्वाधिक म्हणजे 22 हजार 97 नागरिकांनी लस घेतली. रविवारी 225 केंद्रावर अभियान घेण्यात येणार आहे. ज्यांचा दुसरा डोस घेण्याची वेळ झाली आहे. त्यांनी जवळच्या केंद्रावर जाऊन लसीचा दुसरा डोस अवश्य घ्यावा. ज्या नागरिकांना सहव्याधी आहेत त्यांनी सुद्धा लस प्राधान्याने घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. विक्रमी लसीकरणाबद्दल त्यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिषद कक्षात लसीकरण आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील उपजिल्हाधिकारी अर्चना यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आर.एन.फारूकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व डॉ. माधूरी माथुरकर यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात आतार्पंत 7 लाख 72 हजार 643 नागरिकांनी लसीचा पहिला तर 3 लाख 7 हजार 716 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. गुरूवारी जिल्हाभरात विशेष लसीकरण अभियान राबविण्यात आले. या अभियानात 8 हजार 892 लाभार्थ्यांनी पहिला डोस व 13 हजार 205 लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस असे एकुण 22 हजार 97 लाभार्थ्यांनी लस घेतली. आतापर्यंतची एका दिवसातील हे सर्वाधिक लसीकरण आहे. या कामगिरीसाठी आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधींचे जिल्हाधिकारी श्री. कदम यांनी बैठकीत अभिनंदन केले.
जिल्ह्यात लस घेणाऱ्यांची टक्केवारी 86 टक्के एवढी असून भंडारा जिल्हा राज्यात दुसरा आहे. जिल्ह्यात लसीचा साठा पुरेसा असून ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे व त्यांच्या दुसरा डोसची वेळ झाली आहे. अशा व्यक्तींनी आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन दुसरा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्याच प्रमाणे ज्या व्यक्तींना सहव्याधी आहे त्यांनी सुद्धा प्राधान्याने लस घ्यावी. सहव्याधी असणारे व्यक्ती लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत असे निदर्शनास आले आहे. लस घेतल्यामुळे व्याधीग्रस्त व्यक्तींच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. रविवारी 225 ठिकाणी लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी क्षयरोग नियंत्रण, नियमित लसीकरण, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, कोविड लसीरकण यासह आरोग्य विभागाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.