कुलगुरु डॉ. पेडणेकर यांच्या काव्यसंग्रहाचे राज्यपालांकडून प्रकाशन

कुलगुरु डॉ. पेडणेकर यांच्या काव्यसंग्रहाचे राज्यपालांकडून प्रकाशन

मुंबई, दि. 7 : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर यांच्या ‘तू एक मुसाफिर’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले.

कुलगुरु डॉ. पेडणेकर हे कविमनाचे आहेत हे आपणांस आज प्रथमच कळले असे सांगताना रसायन शास्त्राचे प्राध्यापक असलेले पेडणेकर यांच्या कविता रसपूर्ण आहेत असे राज्यपालांनी सांगितले. सेवानिवृत्त होत असलेले पेडणेकर यांच्या जीवनात कवी म्हणून नवा अध्याय सुरु होत आहे याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला तसेच पेडणेकर यांच्या कवितेचे वाचन केले.

डॉ. पेडणेकर यांच्या लिखाणावर अनेक कवींचा आणि विशेषतः आरती प्रभूंचा प्रभाव असून त्यांच्या कविता खूप सकारात्मक असल्याचे ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी सांगितले.

आपल्या कार्यकाळात राजभवनाची दारे अनेक लेखक व कवींना खुली केल्याबद्दल डिम्पल प्रकाशनचे अशोक मुळ्ये यांनी राज्यपालांचे आभार मानले.

करोना काळातील टाळेबंदी मध्ये काव्य लिखाणाची स्फूर्ती झाली व कविता लिहिल्या असे डॉ. पेडणेकर यांनी यावेळी सांगितले. नितीन आरेकर यांनी सूत्रसंचालन केले.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सोनाली पेडणेकर, प्र-कुलगुरू रविन्द्र कुलकर्णी, कुलसचिव सुधीर पुराणिक, प्रभारी कुलसचिव शैलेंद्र देवळाणकर, विविध विभागांचे अधिष्ठाता तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित निमंत्रित उपस्थित होते.