संबधित कंपनीच्या कीटकनाशकांमध्ये 74 टक्के क्रियाशील घटकांची कमतरता Ø शेतकऱ्यांनी विनापावती महागडी कीटकनाशके खरेदी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

संबधित कंपनीच्या कीटकनाशकांमध्ये 74 टक्के क्रियाशील घटकांची कमतरता

Ø शेतकऱ्यांनी विनापावती महागडी कीटकनाशके खरेदी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : जिल्ह्यामध्ये पिकाच्या कीडरोग नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांची विक्री केली जाते. सदर निविष्ठाची गुणवत्ता राखण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद कृषी विभाग व राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या पूर्णवेळ व अर्धवेळ गुण नियंत्रण निरीक्षकाकडून वेगवेगळे कीटकनाशकांचे नमुने घेतले जातात. नमुने घेऊन विहित कार्यपद्धती अनुसरून नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात.

महाराष्ट्र बायो फर्टीलायझर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, लातूर या कंपनीच्या अल्फा क्रॉप (ईमा बेंजोएट-5% एसजी) या कीटकनाशकामध्ये 74 टक्के क्रियाशील घटक कमी आढळून आले आहे. त्यामुळे अशा कीटकनाशकापासून शेतकऱ्यांना अपेक्षित कीड नियंत्रण होऊ शकत नाही. पर्यायाने अशा प्लॉटच्या शेतामध्ये किडीचे प्रमाण वाढून कीड नियंत्रित न झाल्यामुळे तसेच शेतीचे तसेच त्या परिसरात किडीचा प्रादुर्भाव वाढतो. पर्यायाने शेतकऱ्याने कीड नियंत्रणावर खर्च करूनही हातचे पीक जावू शकते. त्यामुळे कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत जिल्ह्यामध्ये प्रति आठवडा कापूस, सोयाबीन, भात व तूर पिकाचे कर्मचारी अधिकारी यांचेकडून निरीक्षणे घेतले जातात.

जिल्ह्यातील 219 कृषी सहायकांनी 6965 कीड रोग निरीक्षणे, 50 कृषी पर्यवेक्षकांनी 1693, 26 मंडळ कृषी अधिकारी यांनी 505, 15 तालुका कृषी अधिकाऱ्यांनी 295, 4 उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी 66 कीडरोग निरीक्षणे घेतली आहे. या माहितीच्या आधारे कृषी विभाग व विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्यामार्फत तसेच एम-किसानच्या आधारे शेतकऱ्यांना कृषी सल्ला दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत विनापावतीची महागडी कीटकनाशके खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी केले आहे.