सिहोरा येथील सावकार हत्याकांडातील तिन्ही आरोपींना प्रत्येकी तीन आजन्म कारावास व 1 लाख 77 हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा

सिहोरा येथील सावकार हत्याकांडातील तिन्ही आरोपींना प्रत्येकी तीन आजन्म कारावास व 1 लाख 77 हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा

भंडारा दि. 05 : बहुचर्चित सिहोरा हत्याकांडातील खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून आरोपींना शिक्षा ठोठविण्यात आली आहे.सिहोरा येथील सावकार हिरालाल डेडावू सिहोरा हे सावकारी करीत होते. आरोपी संजय भाऊराव देरकर यांची हिरालाल डेडावू सोबत यांच्याशी ओळख होती. घटनेच्या दिवशी आरोपी संजय देरकर व त्यांचे दाने साथीदार आरोपी देवेंद्र सुखदेव राऊत व जगदीश उर्फ गोमाजी येवले हे दिवाळीचे दिवशी 4 नोव्हेंबर 2013 रोजी रात्री ते एकटेच घरी असतांना अंदाजे 10.30 वाजताचे सुमारास आरोपीने धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर व उजवे पायाचे मांडीवर वार करून जिवानिशी ठार केले व घरातील खातेदारांचे मृतकाकडे गहाण ठेवलेले सोने-चांदीचे दागीणे व नगदी रूपयाचा दरोडा टाकला. त्याबाबतीत मृतकचा मुलगा अविनाश हिरालाल डेडावू वय 37 वर्षे तुमसर यांनी फिर्याद दिल्याने पोलीस स्टेशन सिहोरा येथे अपराध क्रमांक 48/2013 कलम 302, 397, 201, 353, 120 ब, 34 भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर, आनंद भोईटे व सोबत पोलीस निरिक्षक इंगोले, यादव, सहायक फौजदार जगदीश बुजाडे व सहायक फौजदार ओमकार श्रीवास्तव यांनी तपास करून दोषारोप पत्र सत्र न्यायालयात दाखल केला. सदर प्रकरणात परिस्थिती अन्य पुराव्यावर दोषारोप पत्र दाखल झाले होते. त्यात आरोपींनी गुन्ह्याकरिता विकत घेतलेले धारदार हत्यात व चोरलेले दागिने हस्तगत करण्यात आले होते. आरोपींना गुन्हा करतांना झालेल्या जख्मा व ठिकठिकाणी लपवुन ठेवलेले तसेच नागपूर येथील सराफाकडे गहाण ठेवलेले दागिने तपासादरम्यान हस्तगत केले. एकूण 1100 (7 किलो) सोन्याचे व 1400 ग्राम चांदीचे तसेच रोख रक्कम 1 लाख 51 हजार रूपये दरोड्या दरम्यान चोरीला गेले होते असे एकूण 1.5 कोटी रक्कमेचा माल चोरट्यांनी लंपास केला होता. त्यापैकी 1014 सोन्याचे व 1400 ग्राम चांदीचे दागीन्याचा तपास अधिकाऱ्यांनी छडा लावला. आरोपींचे साक्षदारामार्फत गुन्ह्यांच्या दिवशीच रेखाचित्र काढण्यात आले होते. आरोपींनी ह्या गुन्ह्याच्या रात्री पोलीस कर्मचाऱ्यांवर चाकुने हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. आरोपी सिलेगाव रोड व नहराच्या बाजुने पळाले होते व त्याच ठिकाणांवर चोरीचा माल लपविला होता जो तपास अधिकारी आनंद भोईटे ह्यांनी शोधून काढला. ओळखपरेडमध्ये आरोपींची ओळख पटविण्यात आली होती. दागिण्याची ओळख सुध्दा गहाणदारांनी केली.

सदर गुन्ह्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांचे न्यायालयात चालली, गुन्ह्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता व्हि.जी. तवले यांनी सरकारतर्फे बाजु मांडली व 49 साक्षदार तपासले. 3 सप्टेंबर 2022 रोजी पुराव्यांचे आधारे न्यायालयाने आरोपी नामे संजय भाऊराव देरकर, देविंद्र सुखदेव राऊत, जगदीश उर्फ गोमाजी येवले यांचे विरूद्ध्‍ आरोपी सिद्ध्‍ झाल्याने कलम 302, 120 ब, 460 भां.द.वी. मध्ये प्रत्येक आरोपींना तीन आजन्म कारावास 25 हजार रूपये द्रव्यदंड, द्रव्यदंड न भरल्यास 6 महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कलम 120 ब, 460 भांदवी मध्ये प्रत्येकी 10 हजार रूपये द्रव्यदंड, द्रव्यदंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास, कलम 397 भांदवी मध्ये 10 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रूपये द्रव्यदंड, द्रव्यदंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावास, कलम 353 भांदवी मध्ये 2 वेर्षे सश्रम कारावास व 2 हजार रूपये द्रव्यदंड, द्रव्यदंड न भरल्यास 1 महिना सश्रम कारावास, कलम 201 भांदवी मध्ये 7 वर्षे सश्रम कारावास व 2 हजार रूपये द्रव्यदंड, द्रव्यदंड न भरल्यास 1 महिना सश्रम कारावास ठोठविण्यात आला.