मतदार यादी आधार क्रमांक जोडणीसाठी सर्व मतदान केंद्रावर ४ व ११ सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

मतदार यादी आधार क्रमांक जोडणीसाठी सर्व मतदान केंद्रावर ४ व ११ सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

चंद्रपूर, दि. २ सप्टेंबर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादी आधार क्रमांकाची जोडणी करण्याकरीता चंद्रपूर शहरातील सर्व मतदान केंद्रावर विशेष शिबिरांचे आयोजन दि. ४ व ११ सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे.

७१ – चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर पहिले विशेष शिबिर रविवार दि. ४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर दुसरे विशेष शिबिर रविवार दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिरात नमुना ६ ब अर्ज मतदान केंद्रावर उपलब्ध असेल.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचे द्वारा निवडणुक कायदा ( सुधारणा ) अधिनियम २०२१ अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत. यातील कलम २३ नुसार मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरण करण्यासाठी मतदारांकडुन ऐच्छिकपणे आधारची माहीती संग्रहीत करण्याबाबतची अंमलबजावणी मोहीम १ ऑगस्ट २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश्य मतदाराची अचूक ओळख निश्चित करणे, नोंदींचे प्रमाणीकरण करणे, एका मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त वेळा किंवा एकापेक्षा जास्त मतदारयादीत असेल तर ते दुरुस्त करणे, ज्या मतदारांची नावे मतदारयादीत नसतील त्यांची नावे या यादीत नोंदणे असा आहे. त्यामुळे, ज्या लोकांजवळ आधार कार्ड नाही ते दिलेल्या ११ पर्यायी कागदपत्रांपैकी एक (पॅनकार्ड, फोटोसह किसान पासबुक, पासपोर्ट, इपिककार्ड, मनरेगा जॉबकार्ड, आरोग्य स्मार्टकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, फोटोसह पेंशन कागदपत्र, केंद्र / राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागातील ओळखपत्र इत्यादी) सादर करू शकतील. ओळखपत्रांच्या आधारे त्यांची नावे मतदारयादीत नोंदता येतील किंवा त्यात दुरुस्ती करता येईल.

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाची जोडणी करण्याकरीता मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.