वरठी शहरातून होणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल

वरठी शहरातून होणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल

भंडारा,दि.24: वरठी येथील रेल्वे थर्ड लाईन पुलाचे बांधकाम 27 सप्टेंबर 2021 पासून सुरू होत असून 26 ऑक्टोंबर 2021 रोजी संपणार आहे. त्यामुळे भंडारा ते तुमसर राज्य महामार्गावरील साधारणत: 30 दिवस वाहतूक बंद राहणार आहे. वरठी शहरातील भंडारा-तुमसर-गोंदिया मार्गाने होणाऱ्या जड-अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना पोलीस विभागाने निर्गमित केली आहे. या परावर्तित मार्गाचा अवलंब करून आवागमन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले आहे.
वरठी शहरातून भंडारा ते तुमसरकडे जाणारा राज्य मार्ग क्रमांक 271 हा नागपूर, भंडारा, वरठी, मोहाडी, तुमसर तसेच मध्यप्रदेशात जाण्याकरिता महत्वाचा मार्ग असून सदर मार्गावर भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे सनफ्लॅग कारखाना तसेच गोंदिया जिल्ह्यात अदानी पॉवर प्लांट असे महत्वाचे प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाकरिता लागणारा कच्चा माल घेवून येणाऱ्या जड-अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. सदर मार्गाने जाणारी वाहतूक ही वरठी गावातील रेल्वे क्रासींग मधून करणे शक्य होणार नाही. गावातील मोटार सायकल, छोटे वाहने व बसेस जास्त प्रमाणात आहेत. तसेच या मार्गावरील वाहतूक ही पुर्णपणे बंद करणे शक्य होणार नाही. करिता सदर मार्गाने येणारी जड-अवजड वाहतूक पुढील प्रमाणे वळविण्यात येईल.
नागपूर कडून मोहाडी- तुमसरकडे जाणारी जड वाहने मौजा शहापूर-सातोना-नेरी-पाचगाव-वरठी-मोहाडी येथून पुढे तुमसर- गोंदियाकडे एकेरी वाहतूक (बस,छोटे ट्रक व लहान वाहनाकरिता) तसेच अदानी पॉवर प्लांट मध्ये जाणारी जड-अवजड वाहतूक ही नागपूर-मनसर-रामटेक-खापा मार्गे तिरोडाकडे जाईल.
साकोली, लाखनी, पवनी, अड्याळवरून भंडाराकडून मोहाडी तुमसरकडे जाणारी जड-अवजड वाहतूक भंडारा-खामतलाव-सातोना-खात-अरोली-घोटीटोक वरुन कांद्री-जांब-खापा चौक येथून पुढे तुमसर- गोंदियाकडे जाईल. गोंदिया, तिरोडा अदानी प्लांट तुमसरकडून भंडारा नागपूरकडे जाणारी जड-अवजड वाहने खापा चौकातून जांब-कांद्री-रामटेक मार्गे भंडारा व नागपूरकडे जाईल.
गोंदिया- तिरोडाकडून भंडारा, नागपूरकडे जाणाऱ्या जड वाहनाकरिता एकेरी वाहतूक माडगी-रोहा-बेटाळा-कोथुर्णा-दाभा-भंडारा (फक्त बस, छोटे ट्रक व लहान वाहनाकरिता) तुमसर, मोहाडीकडून भंडाराकडे जाणारी वाहतूक खापा चौक-मोहाडी-कुसारी फाटा-रोहा-बेटाळा-कोथुर्णा-दाभा-भंडारा (फक्त बस, छोटे ट्रक व लहान वाहनाकरिता) नागपूर, भंडारा, वरठी, मोहाडी, तुमसरकडे जाणारी व येणारी एस.टी. बस, हलकी व छोटी वाहने भंडारा-वरठी गावातून रेल्वे क्रॉसिंग वरून भंडारा- तुमसरकडे वळविण्यात आली आहे. नागरिकांनी परावर्तित मार्गाचा अवलंब करावे, असे आवाहन पोलीस विभागाव्दारे करण्यात आले आहे.