मुल नगर परिषदेचे सहा रोजंदारी कर्मचारी स्‍थायी होणार

मुल नगर परिषदेचे सहा रोजंदारी कर्मचारी स्‍थायी होणार

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्‍या बैठकीत झाला निर्णय

चंद्रपूर जिल्‍हयातील मुल नगर परिषदेतील सहा रोजंदारी कर्मचा-यांना मुल नगर परिषदेत जागा रिक्‍त नसल्‍यामुळे विभागातील नजिकच्‍या नगरपालिकेत रिक्‍त जागांच्‍या उपलब्‍धतेनुसार सामावून घेण्‍यात यावे असा प्रस्‍ताव सादर करण्‍यात यावा असे निर्देश प्रधान सचिवांनी सम्बंधिताना दिले.शासनातर्फे त्‍वरीत प्रस्‍तावाला मान्‍यता देण्‍यात येईल असे आश्‍वासन नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्री. महेश पाठक यांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले.
दिनांक १६ सप्‍टेंबर रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल नगर परिषदेतील सहा रोजंदारी कर्मचा-यांना सेवेत स्‍थायी करण्‍याबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्री. महेश पाठक यांच्‍याशी चर्चा केली. या बैठकीला नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक श्री. किरण कुलकर्णी, नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी सिध्‍दार्थ मेश्राम यांच्‍यासह मुल नगर परिषदेचे रोजंदारी कर्मचारी उपस्थित होते.
सहा रोजंदारी कर्मचा-यांपैकी एका कर्मचा-याची शै’क्षणिक अर्हता पूर्ण नसल्‍यामुळे शैक्षणिक अर्हतेनुसार सुट देण्‍याकरिता स्‍वतंत्र प्रस्‍ताव सादर करण्‍याच्‍या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्‍या. त्‍याअनुषंगाने प्रधान सचिवांनी याबाबतचा प्रस्‍ताव सादर करण्‍याचे निर्देश संबंधितांना दिले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत सातत्‍याने पाठपुरावा केला आहे. सदर प्रस्‍तावाला त्‍वरीत मान्‍यता देण्‍यात येईल, असे आश्‍वासन प्रधान सचिव महेश पाठक यांनी दिले. आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकारामुळे मुल नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचा-यांना स्‍थायी करण्‍याबाबतचा प्रश्‍न आता कायमस्‍वरूपी निकाली निघणार आहे.