ज्येष्ठ नागरिकांसाठी 14567 हेल्पलाईन

ज्येष्ठ नागरिकांसाठी 14567 हेल्पलाईन

भंडारा,दि.16:- सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार मार्फत देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यात 14567 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून बेघर व अत्याचार ग्रस्त वृध्द व्यक्तींनी या हेल्पलाईनचा आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन तर्फे चालविली जाते. सदर राष्ट्रीय हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 14567 असा आहे. तसेच शासन निर्णय 9 जुलै 2018 च्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र्य जेष्ठ नागरिक कक्ष निर्माण करुन त्याव्दारे सनियंत्रण करण्याचे निर्देश असल्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन जिल्हा परिषद चौक भंडारा (तळ मजला) येथे स्वतंत्र जेष्ठ नागरिक कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.
या राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी, जेष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवा देण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांना कळविण्यात येते की, आपल्या समस्या, तक्रारीच्या निवारणासाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिव्हील लाईन जिल्हा परिषद चौक भंडारा (तळ मजला) येथे भेट द्यावी.