अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना

अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना

भंडारा,दि.9:- राज्यात उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी संपूर्ण राज्यात खावटी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ 50 टक्के रोख व 50 टक्के वस्तू स्वरुपात अनुदान देण्यास शासन स्तरावरुन सुरूवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखनी, लाखांदूर, पवनी व साकोली या सात तालुक्यात अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभ मिळावा यासाठी आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांव्दारे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात गावनिहाय व तालुका निहाय सर्वेक्षण करुन लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश गरीबातील गरीब लाभार्थ्यांना लाभ द्यावयाचा असून खावटी अनुदान योजनेपासून काही गरजू आदिवासी लाभार्थी वंचित असतील किंवा काही कारणास्तव अर्ज भरले नसतील, कामानिमीत्त बाहेरगावी गेले असतील तसेच कागदपत्रा अभावी गरजू लाभार्थी सदर योजनेचा फार्म भरणे बाकी असतील तर त्या दृष्टीने जवळच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळेत तसेच शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वस्तीगृहामधिल गृहपाल किंवा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भंडारा कार्यालयाशी संपर्क करावा. असे आवाहन एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंबे ज्यामध्ये परितक्त्या, घटस्फोटीत महिला, विधवा, भूमिहीन शेतमजूर, दिव्यांग व्यक्ती असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपण करणारे कुटुंब तसेच वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्क धारक कुटुंब यांना लाभ घेता येणार आहे.