उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

0

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई/ चंद्रपूर, दि. 27 : राज्य शासनाने दि. 31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख 50 हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 ऑगस्ट 2022 हा आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे किंवा स्थानिक पोलिस ठाणे अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर what is new या शीर्षकावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विहित नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई मेल वर दिनांक 30 ऑगस्ट 2022 पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल, अशी माहिती पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here