महाकृषी ऊर्जा अभियाना अंतर्गत “प्रधानमंत्री कुसुम-ब योजना” 

महाकृषी ऊर्जा अभियाना अंतर्गत “प्रधानमंत्री कुसुम-ब योजना” 

90 ते 95% अनुदानाची पर्यावरणपूरक हरित क्रांतीची !

गडचिरोली, दि.18: महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) तर्फे राज्यातील कृषीपंप वीज जोडणीचे सौर ऊर्जाद्वारे विद्युतीकरणाची प्रधानमंत्री कुसुम ब योजना 90-95% अनुदानावर राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यात पारेषण विरहित सौर कृषी पंपाची आस्थापना करण्यात येणार असुन शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होईल. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3HP, 5HP व 7.5HP क्षमतेचे पारेषण विरहित सौर पंप आस्थापित करता येतील. सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्यांचे कृषीपंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती तसेच अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी हिस्सा भरून सौर पंप उपलब्ध होऊ शकेल. शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहनारे नदी/नाले, शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे, पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे, अटल सौर कृषी पंप योजना टप्पा 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेले तथापी मंजुर न झालेले शेतकरी/अर्जदार या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र ठरतील. करिता गडचिरोली जिल्हयामधील शेतकऱ्यांनी सदर योजनेचे जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आव्हान महाऊर्जा चंद्रपूर जिल्हा कार्यालयाचे वतीने करण्यात आले आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाइन नोंदणीसाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusumyojana/component-B या संकेत स्थळावर भेट द्यावी किंवा महाऊर्जा जिल्हा कार्यालय, तळमजला, प्रेस्टिज प्लाजा, विवेकनगर, मुल रोड, चंद्रपुर येथे संपर्क साधण्यात यावा.(दुरध्वनी क्रं. 07172-256008) असे जिल्हा व्यवस्थापक महाऊर्जा कार्यालय, चंद्रपूर यांनी कळविले आहे.