राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित 1424 तर दाखलपूर्व 1665 प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित 1424 तर दाखलपूर्व 1665 प्रकरणे निकाली

चंद्रपूर, दि. 17 ऑगस्ट : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरमार्फत जिल्हा व तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर लोक अदालतीचे आयोजन दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा कविता बि. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. लोकअदालतीमध्ये प्रलंबित व दाखलपूर्व अशी एकूण 19 हजार 996 प्रकरणे ठेवण्यात आली, त्यापैकी प्रलंबित 1424 तर दाखल पूर्व 1665 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

कौटुंबिक प्रकरणापैकी एकूण तीन प्रकरणातील जोडपे एकत्र नांदण्यासाठी गेले. मोटार अपघात प्रकरणांमध्ये 2 कोटी 6 लक्ष 80 हजार नुकसान भरपाई वसूल करुन देण्यात आली. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी दिली. लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी व पोलीस यांनी परिश्रम घेतले.