गणेशोत्सव २०२२ – ग्राहकांनी मूर्तिकारांकडून मातीच्या मूर्तीची प्रमाणित पावती घ्यावी पीओपी मुर्तीस पुर्णपणे बंदी

गणेशोत्सव २०२२ – ग्राहकांनी मूर्तिकारांकडून मातीच्या मूर्तीची प्रमाणित पावती घ्यावी पीओपी मुर्तीस पुर्णपणे बंदी

नोंदणी न करता मूर्ती विक्री करणाऱ्यावर होणार कारवाई

रेन वॉटर हार्वेस्टींगबाबत आकर्षक बक्षिसे

चंद्रपूर १७ ऑगस्ट : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली असून, विक्री, आयात आणि निर्मिती होताना आढळल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे मूर्तीची खरेदी करताना ती मातीचीच असल्याची प्रमाणित पावती ग्राहकांनी घ्यावी आणि ती मूर्तिकरांनी आपल्या स्वाक्षरीनिशी संपर्क क्रमांकासह द्यावी, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपिन पालीवाल यांनी केले.

चंद्रपूर शहरातील गणेशोत्सव पूर्वतयारीसाठी अधिकारी आणि मूर्तिकार यांची मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत शुक्रवार रोजी (ता. १२) बैठक घेण्यात आली. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल, शहर अभियंता महेश बारई, सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे, सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धे, स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी आणि मूर्तिकार प्रतिनिधींची उपस्थिती होती.यंदा महाराष्ट्रात गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. मात्र श्रीगणेशाच्या पीओपी मुर्तींवरील बंदी कायम आहे तेव्हा निर्बंध नसले तरी पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.

गणेशोत्सवासह विविध उत्सवात मातीच्या मूर्ती विक्री करणाऱ्या मूर्तीकारांना चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणी न करता मूर्ती विक्री करणाऱ्यावर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही नोंदणी आपापल्या परिसरातील झोन कार्यालयात करायची आहे. तसेच पीओपी मूर्तीची विक्री, आयात आणि निर्मिती करताना आढळल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल होणार आहे.

शहरात एकही पीओपी मूर्तीची स्थापना आणि विक्री होणार नाही, यासाठी कठोर पावले उचलण्यात येणार असून, त्यासाठी झोननिहाय पथकांची नियुक्ती करून प्रत्यक्ष आणि गुप्त पद्धतीने तपासणी केली जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीची विक्री होते. अशावेळी पीओपीच्या मूर्ती बाजारात विक्रीस येण्याची शक्यता असते. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी विक्रीच्या ठिकाणी मनपाच्या विशेष पथकाद्वारे प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. शंका वाटल्यास मूर्तीचे नमुने ताब्यात घेऊन चौकशीअंती कारवाई केली जाणार आहे.

मागील वर्षी शहरात पीओपी मुर्ती वापरास पुर्णपणे बंदी घालण्यात आली होती, चंद्रपूर शहर महानगरपालिकेने व्यापक जनजागृती केली त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळुन एकही पीओपी मूर्तीची विक्री झाली नाही. शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी मनपाच्या कृत्रिम कुंडाचा लाभ घेत ८०६४ गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरकरीत्या केले व १०० टक्के पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यास हातभार लावला होता.

पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन म्हणुन देखावे स्पर्धा घेण्यात येणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टींगचे देखावे तयार करणाऱ्या गणेश मंडळांना आकर्षक बक्षिसे सुद्धा देण्यात येणार आहेत. यंदा निर्बंध नसले तरी सर्वानी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टीने कमी उंचीच्याच गणेशमूर्तींची स्थापना करण्यासाठी पुढाकार घ्यावा व मूर्ती मनपाद्वारे व्यवस्था करण्यात आलेल्या विसर्जनस्थळीच विसर्जीत कराव्यात.

गणेशोत्सवादरम्यान प्रदूषणास हानी होईल, अशा मूर्तीची निर्मिती करू नये, मातीच्या मूर्तींना अपायकारक रंगाचा वापर न करता नैर्सगिक रंगाचा वापर करावा, घरगुती बाप्पांचे विसर्जन शक्यतो घरीच करावे अथवा फिरते विसर्जन कुंड व कृत्रीम तलावात करावे, निर्माल्य कुंडाचा वापर करावा, थर्माकोल आणि सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.