विभाजन विभिषीका प्रदर्शनाद्वारे उलगडल्या गतकाळाच्या स्मृती सिंधी बांधवांनी कथन केल्या फाळणीच्या आठवणी

विभाजन विभिषीका प्रदर्शनाद्वारे उलगडल्या गतकाळाच्या स्मृती सिंधी बांधवांनी कथन केल्या फाळणीच्या आठवणी

भंडारा, दि. 14 : देशाची फाळणी हा एक कटू अनुभव होता. फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अनेक समाज व समुह विस्थापीत झाले. त्यामध्ये सिंधी समाज विस्थापित झाला. फाळणीमुळे सिंधी समाजाच्या मनावर खोल जखमा झाल्या. त्या काळातील काही कटू स्मृतींना आज लक्ष्मी हॉल येथे सिंधी समाजातील मान्यवरांनी उजाळा दिला.

अत्यंत धीरगंभीर वातावरणात झालेल्या कार्यक्रमामध्ये फाळणीच्या काळामध्ये झालेल्या घडामोडींचे चित्र प्रदर्शन लावण्यात आले होते. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, अतिरिक्त जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील हे उपस्थित होते.

यावेळी सिंधी पंचायतचे तुमसर, लाखनी, भंडारा येथील पदाधिकारी उपस्थित होते. गोपीचंद दलवाणी हे फाळणीच्या वेळी 9 वर्षाचे होते. तेव्हाच्या त्यांच्या कटू स्मृतींचा आलेख मांडला. तर गुलराज कुंदवाणी यांनी सिंधी समाज आर्थिकरित्या सधन असतांना या फाळणीमुळे त्यांच्या अनेक पिढ्यांचे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली. फाळणीमध्ये स्त्रियांवर अनेक अत्याचार झाले ही खुप शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अनिल टहलयानी यांनी सिंधी समाजाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी विषयी विस्तृतपणे माहिती दिली. सिंधी संस्कृतीच्या वैभवी परंपरेची मांडणी त्यांनी अत्यंत मोलाचे दाखले देत केली. आम्ही शरणार्थी नसून भारतीय असल्याचे त्यांनी सांगितले.

भंडारा सिंधी पंचायत समितीचे अध्यक्ष जॅकी रावलानी यांनी राजकीय क्षेत्रात, तसेच प्रशासकीय सेवेमध्ये सिंधी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच विविध दाखले त्यांनी राजकीय क्षेत्रातील सिंधी बांधवांचे योगदान यावर प्रकाश टाकला.

जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी अध्यक्षीय भाषणात फाळणी संदर्भात काही ऐतिहासिक दाखले देत माहिती दिली.तसेच सिंधी बांधवाच्या अडचणीत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. देशाच्या फाळणीमूळे लाखो लोकांनी झेललेले दु:ख, यातना या न विसरता येणाऱ्या आहेत. अनेकांनी यात बलिदान दिले. त्या ज्ञात- अज्ञात सर्व व्यक्तीच्या स्मृती प्रित्यर्थ आज 14 ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळण्यात आला. फाळणीतील महत्वपूर्ण घटनांचे छायाचित्र व त्या संदर्भातील माहिती नव्या पिढीपर्यंत पोहचावी या उद्देशाने खास तयार करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांनी केले.