खरीप हंगामामधील पिकस्पर्धेमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा.

खरीप हंगामामधील पिकस्पर्धेमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा.

भंडारा, दि. 12 : राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागामध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची ईच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनविन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकुण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यातंर्गत पिक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरावरील बक्षिसे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तालुका पातळीवर प्रथम रूपये 5 हजार, व्दितीय रूपये 3 हजार व तृतिय रूपये 2 हजार, जिल्हा पातळीवर प्रथम रूपये 10 हजार, व्दितीय रूपये 7 हजार व तृतिय रूपये 5 हजार, विभाग पातळीवर प्रथम रूपये 25 हजार, व्दितीय रूपये 20 हजार व तृतिय रूपये 15 हजार, राज्य पातळीवर प्रथम रूपये 50 हजार, व्दितीय रूपये 40 हजार व तृतिय रूपये 30 हजार बक्षिसाचे स्वरूप निर्धारित केलेले आहे.

सदर स्पर्धेमध्ये भात, ज्वारी, मका, तूर, सोयाबीन व भूईमुग या खरीप पिकांचा समावेश केलेला आहे. पिकस्पर्धेतील पिकांची निवड करतांना तालुक्यातील क्षेत्र किमान 1000 हे. असावे. पिकस्पर्धेसाठी सर्व शेतकऱ्यांना भाग घेता येईल. स्पर्धेमध्ये भाग घेतांना शेतकऱ्यांकडे त्यांचा नावावर 0.10 हे. पेक्षा जास्त जमीन असली पाहिजे. व जमीन ते स्वत: करत असले पाहिजे. स्पर्धेसाठी शुल्क सर्वसाधारण व आदीवासी गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी रू.300 राहील. स्पर्धेकरीता अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगष्ट 2022 आहे. तरी ईच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीकरीता कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरूण बलसाणे यांनी केले आहे.