विद्यार्थ्यांनी शासन मान्यता नसलेल्या व अनधिकृत संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नये

विद्यार्थ्यांनी शासन मान्यता नसलेल्या व अनधिकृत संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नये

चंद्रपूर, दि. 11 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामार्फत विविध 36 गटात कौशल्य, व्यवसाय शिक्षण व व्यवसाय प्रशिक्षणासंबंधी प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम शासन मान्यता व मंडळाद्वारे संलग्नता प्राप्त शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थांमार्फत राबविण्यात येत आहे. कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अभ्यासक्रम व संस्थांना मंडळ तसेच राज्य व प्रसंगी केंद्र शासनाची मान्यता असणे आवश्यक आहे. मंडळाच्या https://msbsd.edu.in या संकेतस्थळावर सक्षम प्राधिकरणांची मान्यता असलेल्या संस्था व सदर संस्थेमध्ये चालविल्या जाणाऱ्या अधिकृत अभ्यासक्रमांची यादी उपलब्ध आहे.

शासनाची मान्यता नसलेल्या अनधिकृत संस्था प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना खोटी आमिषे दाखवून अथवा संस्था मान्यताप्राप्त आहे असे भासवून प्रवेश घेण्यास प्रवृत्त करतात व नंतर विद्यार्थ्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते.

महाराष्ट्र राज्य कृषी, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च,तंत्र व व्यवसाय शिक्षण यामध्ये अनाधिकृत संस्था स्थापन करण्यास आणि अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम सुरू करण्यास मनाई करण्याकरिता व संबंधित किंवा अनुषंगिक बाबीकरीता तरतूद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व व्यवसाय शिक्षण यामधील अनधिकृत संस्था व अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम (प्रतिबंध) अधिनियम 2013 (सन 2013 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.20) करण्यात आला आहे. त्यानुसार प्रकरण दोन, कलम 3 अन्वये, महाराष्ट्र राज्यात व्यवसाय शिक्षण यामधील अनधिकृत संस्था करण्यास आणि अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम सुरू करण्यास व जाहिरात करण्यास मनाई करण्यात आली आहे.

कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संबंधी प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थी वर्ग व पालकांनी महाराष्ट्र शासनाची मान्यता व महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाची संलग्नता नसलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नये. अनधिकृत संस्थेच्या भूलथापांना, त्यांच्या खोट्या दाव्यांना व जाहिरातींना बळी न पडता संस्था व अभ्यासक्रमांची मान्यता शासनाच्या व मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासून खात्री करावी व नंतरच प्रवेश घ्यावा. उपरोक्त अभ्यासक्रमांसाठी राज्यातील संस्था व अभ्यासक्रम मान्यतेबाबत व अनधिकृत संस्थांच्या तक्रारीबाबत मंडळ, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अथवा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.