स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत 9 ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत 9 ऑगस्ट रोजी

सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम

Ø जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 8 ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहणाऱ्या या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम, विविध पातळीवर आयोजित करणे अपेक्षित आहे. राज्यातही या उपक्रमांतर्गत विविध पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे.

त्याअनुषंगाने दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रमाला उपस्थित रहावे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही यावेळी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गायनास्तव आवाहन करावे.

जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्कार व्हावे या उद्देशाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत राज्यात स्वराज्य महोत्सवातंर्गत विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. स्वराज्य महोत्सवातंर्गत राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर आयोजित करावयाचे विविध कार्यक्रमाचे व उपक्रमाचे स्वरूप निश्चित केले आहे, त्यानुसार स्वराज्य महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रमाचे यशस्वीरित्या जास्तीत जास्त जनसभागातून आयोजन करण्यात यावे. असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.