धानोरा तालुक्यातील जांभळी येथे मत्स्य पालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

धानोरा तालुक्यातील जांभळी येथे मत्स्य पालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

गडचिरोली, दि.03: आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे युनीसेक इंडिया संचलित वनहक्क व पेसा चे सूक्ष्म नियोजन आणि संसाधन व्यवस्थापन केंद्र, गडचिरोली केंद्रा मार्फत धानोरा तालुक्यातील जांभळी या ग्रामसभेत मत्स्य पालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. मत्स्य व्यवसाय प्रशिक्षणाला मार्गदर्शक म्हणून विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन केंद्र गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील मोंटी मेश्राम हे उपस्थित होते. जांभळी गावातील बचत गटाच्या माध्यमातून मत्स्यपालन करणाऱ्या महिलांना आज मत्स्य पालन व्यवसाय याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. माशांचे संगोपन कशा पद्धतीने केल्या जावे, माशांना चारा कोणता व कशा पद्धतीने दिल्या जावे, चारा कुठून घेण्यात यावा, मासे पाळण्यासाठी मासे कुठून घेण्यात यावे तसेच बचत गटाच्या माध्यमातून मत्स्य पालन हा व्यवसाय कशा पद्धतीने वाढवता येणार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मत्स्य शेती वाढवायचं असेल तर त्यांचे संगोपन व काळजी योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे असे मत मोंटी मेश्राम यांनी व्यक्त केले. यावेळेस कार्यक्रमाला जांभळी या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, वन हक्क समितीचे अध्यक्ष आणि गावातील महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या तसेच आपल्या केंद्रातर्फे सल्लागार धोरणे व आपरेशन, मास्टर ट्रेनर, कृषी सल्लागार तसेच कम्युनिटी मोबिलायझर उपस्थित होते.