राज्यभरातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाची चंद्रपूर मनपाच्या शाळांना भेट

राज्यभरातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाची चंद्रपूर मनपाच्या शाळांना भेट

चंद्रपूर, ता. २० : राज्यभरातील नगरपालिका आणि महापालिका शाळांतील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या विविध शाळांना भेटी दिल्या. सध्या कोरोनामुळं शाळा बंद होत्या. अशावेळी ऑनलाईन शिक्षणाची सोय चंद्रपूर महापालिकेने सुरु केली. ज्या विद्यार्थाकडे ऑनलाईन सुविधा नाही, अशासाठी त्यांच्या घरी जाऊन ऑफलाईन शिक्षण देण्यात आले. ज्यांना कॉन्व्हेंटचं शिक्षण परवडत नाही, अशा पालकांसाठी ही शाळा मोठी संधी निर्माण करून देणारी ठरलीय. हा उपक्रमशील प्रयोग बघण्यासाठी शिष्टमंडळ चंद्रपूर शहरात आले होते.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांच्या भिंती बोलक्या आहेत. बसण्याची व्यवस्था नेटकी. पिण्याचं स्वच्छ पाणी, अग्निशमन बंब, पंखे आहेत. महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू आणि तेलगु शाळा शहरात सुरू आहेत. या शाळेत डिजीटल पद्धतीने शिक्षण सुरु केल्यामुळे कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आता मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत एकूण 29 शाळा कार्यरत आहेत. यामध्ये तीन शाळांत तेलुगु, तीनमध्ये हिंदी, दोनमध्ये उर्दू शिक्षण दिलं जात असून, 21 शाळांत मराठी-सेमी इंग्रजी शिकवलं जातं. यात सोळा शाळांमध्ये नर्सरी, केजीचं शिक्षणसुद्धा दिलं जात आहे. 2016-17 मध्ये या सर्व शाळांतील विद्यार्थीसंख्या 2571 होती. ती यावर्षी 3454 इतकी झाली आहे.

महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ, शाखा महानगरपालिका चंद्रपूरच्या वतीने शैक्षणिक कार्यशाळा घेण्यात आली. यानिमित्ताने राज्यभरातून आलेल्या नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकानी चंद्रपूर मनपाच्या शाळांना भेटी दिल्या. यात सावित्रीबाई फुले शाळा, शहिद भगतसिंग शाळा, महात्मा फुले शाळा यांचा समावेश होता. शिष्टमंडळात प्रयोगशील मुख्याध्यापक अर्जुन कोळी (नगर परिषद कराड शाळा जि. सातारा), अरूण पवार (अहमदनगर महानगरपालिका), सुनील खेलूरकर (नाशिक महानगरपालिका), सुभाष कोल्हे (बुलढाणा), साधनाताई साळूंखे (नगरपरिषद खापोली), मायाताई कांबळे (लातूर महानगरपालिका), प्रिया सिंग (औरंगाबाद महानगरपालिका), नंदा तादंळे (नगरपरिषद लोणावळा), सविता बोरसे (नाशिक महानगरपालिका), बाबासाहेब कडकल (नाशिक महानगरपालिका), संग्राम गाढवे (नगरपरिषद कराड) सहभागी झाले होते. चंद्रपूर मनपाचे शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत यांनी शिष्टमंडळाला सविस्तर माहिती दिली.