वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा – पालकमंत्री वडेट्टीवार

वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा – पालकमंत्री वडेट्टीवार

Ø  प्रत्येक गावातील तरुणांना प्रशिक्षित करण्याचे निर्देश

Ø ‘इको टूरिझम’ अंतर्गत विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक

चंद्रपूर, दि. 21 ऑगस्ट :  ब्रम्हपूरी वनविभागांतर्गत वाघांची संख्या ताडोबापेक्षा जास्त आहे. या परिसरातील जवळपास 150 गावे अतिसंवेदनशील असून वाघ आणि बिबट्याचा मुक्तसंचार या परिसरात आहे. त्यामुळे वन्यजीव-मानव संघर्ष शिगेला पोहचला असून या संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

वाघांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर ब्रम्हपूरी वन विभागाच्या विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, बी.एच. हुडा, उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा, ब्रम्हपूरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पोलिस उपअधिक्षक मिलिंद शिंदे, तहसीलदार विजय पवार, जि.प.सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी,वनसंरक्षक दलाचे प्रमुख बंडू धोत्रे, राजेश कांबळे आदी उपस्थित होते.

गावात वाघ येऊच नये किंवा आला तर त्याला कसे पळवायचे याबाबत प्रशिक्षणाची गरज आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, यासाठी शरीरयष्टी चांगली असलेल्या स्थानिक तरुणांना प्रशिक्षित करा. किमान एका गावात पाच तरुण याप्रमाणे संवदेनशील असलेल्या जवळपास 150 गावातील तरुणांची निवड करा. वाघांच्या हल्ल्यात बहुतांश गुराखी जखमी किंवा मृत होत आहे. वाघ जनावरावर हल्ला करतो, आपल्या जनावराला वाचविण्याच्या प्रयत्नात गुराखी वाघाचा प्रतिकार करतो, त्यामुळे तो वाघाचा शिकार ठरत आहे. मात्र अशावेळी गुराख्यांनी जनावराला सोडून आपला जीव वाचवावा. वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या जनावराचा मोबदला वनविभागाकडून देण्यात येतो.  त्यामुळे किमान मानवी जीव जाणार नाही, याबाबत सर्वांना अवगत करावे.

पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले, ब्रम्हपूरी विभागात वाघांची संख्या 114 तर बिबट 110 आहेत.   मानव – वन्यजीव संघर्षामुळे नागरिकांत असंतोष आहे. त्यामुळे वाघांची स्थानांतर करता येते का, याबाबत धोरण निश्चित करावे. वाघ महत्वाचा असला तरी मानवी जीवसुध्दा महत्वाचा आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेंतर्गत प्रत्येक गावातील शेतीला सोलर कुंपण करणे, गावाला चॅनलिंग कुंपण करणे, जंगलाला लागून असलेल्या शेतावर जाऊ नये म्हणून त्याच्या मोबदल्या स्वरुपात 10 हजार रुपयांची मदत करणे, श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेची व्याप्ती वाढवून अतिरिक्त 150 गावात ही योजना प्रभावीपणे राबविणे, जवळ आलेल्या वाघाला पळविण्यासाठी विशेष काठी खरेदी करणे आदी उपाययोजना कराव्यात. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

दोन-तीन दिवसात मुख्यमंत्र्यांकडे बैठक : मानव –वन्यजीव संघर्ष कमी करून राबविण्यात येणा-या उपाययोजनेबाबत तसेच इको – टूरिझम विकसीत करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या दोन- तीन दिवसांत बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. 114 वाघांचे वास्तव्य असलेल्या ब्रम्हपूरी – सिंदेवाही या परिसरात जंगल सफारी विकसीत करणे तसेच पर्यटनक्षेत्र म्हणून विकास करून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. संवेदनशील असलेल्या 125 गावांना दरवर्षी 25 लक्ष रुपये देऊन प्रभावी उपाययोजना करण्यात येतील. जेणेकरून वाघ आणि बिबटचा वावर गावात होणार नाही, असेही पालकमंत्री म्हणाले.