रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दैंनदिन आहारात रानभाज्यांचा समावेश करा -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी

दैंनदिन आहारात रानभाज्यांचा समावेश करा

-पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø रानभाजी महोत्वाचा समारोप

चंद्रपूर दि. 16 ऑगस्ट : शासनाने रानभाजीचे महत्व ओळखून रानभाजी महोत्सव राज्यभरात सुरू केला आहे. कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता नैसर्गिकरीत्या आढळून येणाऱ्या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असून या भाज्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या संकटाचा आपण सामना करीत आहो. या संकटात तसेच आजारापासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे असल्यामुळे नागरिकांनी दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश करावा, असे आवाहन  जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

कृषी भवन येथे रानभाजी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, तालुका कृषी अधिकारी रवींद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सर्वप्रथम रानभाजी महोत्सवातील स्टॉलला भेट देत पाहणी केली. पालकमंत्री म्हणाले की, कोरोनासारखी संसर्गजन्य महामारी सर्व देशात पसरली आहे. या काळात ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम होती ती व्यक्ती जगली. रानभाज्यांमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. विविध प्रकारच्या रानभाज्या या महोत्सवात पहायला मिळाल्या, त्यापेक्षा अधिक भाज्यांची ओळखही या ठिकाणी झाली.

पूर्वीच्या काळी कोणत्याही रासायनिक खतांचा वापर होत नव्हता, मात्र आताच्या काळात रासायनिक खतांचा वापर फार मोठ्या प्रमाणात केल्या जातो. उत्पन्न वाढीसाठी देखील रासायनिक खतांचा व युरियाचा सर्रास वापर होत असून याचा दुष्परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत आहे. या रानभाज्यांवर कीटकजन्य व बुरशीजन्य अशी कोणतीही रासायनिक फवारणी व खतांचा वापर होत नाही. त्यामुळे या रानभाज्या आरोग्यास उपयुक्त व फलदायी आहे. डॉक्टरपेक्षा चांगल्या इलाज करण्याचे साधन म्हणजे या रानभाज्या आहेत. त्यामुळे दैनंदिन आहारात या भाज्यांचे सेवन करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे पालकमंत्री श्री वडेट्टीवार म्हणाले.

या रानभाज्यांचा प्रचार-प्रसार करणे आणि या भाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे फार महत्त्वाचे आहे. या रानभाज्या वर्षभरातून फक्त दोन महिन्यातच उपलब्ध होतात, त्यामुळे येणाऱ्या पिढीला जे मिळत नाही ते मिळण्याची आवश्यकता आहे. म्हणून या महोत्सवाच्या माध्यमातून कृषी विभागाने कायमस्वरूपी स्टॉल जिल्ह्याच्या मुख्यालयी महिला बचत गट व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना श्री. वडेट्टीवार यांनी कृषी विभागाला दिल्या.

या रानभाज्यामध्ये लोह व प्रोटीनची मात्रा भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी या रानभाज्याचा आस्वाद घेतल्यास कोरोना सारख्या आजारावर निश्चितच मात करता येऊ शकते. यासाठी त्यांनी दैनंदिन आहारात या भाज्यांचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर जिल्हा हा बहुरंगी, बहुआयामी, बहुल पिके घेणारा जिल्हा आहे. भात,कापूस, सोयाबीन आणि पालेभाज्यांसाठी स्वयंस्फूर्त असा हा जिल्हा असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल निर्यात करण्यासाठी कृषिमाल निर्यात कक्षाची स्थापना जिल्हा स्तरावर करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

रानभाज्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीत आढळून येतात. कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सवाचे आयोजन काही दिवसापुरते न करता हा महोत्सव एक ते दीड महिन्याचा कालावधीपर्यंत राबविण्यात यावा. तसेच या रानभाज्या विक्रीसाठी कृषी विभागाने महिन्याभरासाठी शेतकऱ्यांना व महिला बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून द्यावे. स्टॉल उपलब्ध करून दिल्यास रानभाजी तसेच महिला बचत गटामार्फत इतरही उत्पादने विक्रीस ठेवता येईल. यातून शेतकऱ्यांना योग्य तो आर्थिक मोबदला मिळेल व त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत देखील मिळेल त्यामुळे कृषी विभागाने कार्यालय परिसरातच तात्पुरत्या स्वरूपात साधारणत 50 स्टॉल उपलब्ध करून द्यावे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी कृषी विभागाला सुचविले.

या महोत्सवानिमित्त रानभाज्या काय आहे? याची शहरी भागातील नागरिकांना माहिती मिळत आहे. या रानभाज्यांचा चांगला वापर आहारात झाल्यास नागरिकांना चांगले आरोग्य मिळेल. व रानभाज्यांच्या  माध्यमातून रोजगार देखील प्राप्त होईल असे जिल्हाधिकारी  अजय गुल्हाने म्हणाले. या रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हा व तालुका स्तरावर 5 लाख रुपये विक्रमी उत्पन्न झाले असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी सांगितले.

यावेळी, राज्यस्तरीय, विभागस्तरीय तसेच तालुकास्तरीय पीक स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत  विकेल ते पिकेल अभियानामध्ये छत्री, वजन काटा, टेबल-खुर्ची इत्यादी साहित्य वितरित करण्यात आले.  खनिज विकास प्रतिष्ठान अंतर्गत सोलर लाइट ट्रॅप चे 90 टक्के अनुदानावर वितरण करण्यात आले. तर खनिज विकास प्रतिष्ठान अंतर्गत पीक संरक्षण फवारणी किटचे 100 टक्के अनुदानावर वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.