स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ऊर्जा महोत्सवाचा शुभारंभ

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ऊर्जा महोत्सवाचा शुभारंभ

भंडारा, दि 27 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव पॉवर @2047 साजरा करण्यासाठी आयोजित ऊर्जा महोत्सवाचा पोलीस मुख्यालयातील बहुउद्देशीय सभागृह येथे आयोजित भव्य समारंभात शुभारंभ करण्यात आला.

आझादी का अमृत महोत्सव पॉवर @2047 केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशातील सर्व जिल्ह्यात विशेष अभियान राबविण्यात येत असून त्यानुसार महावितरणच्या वतीने राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

ऊर्जा महोत्सवातील पहिला कार्यक्रम आज संपन्न झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक, परियोजना प्रमुख एनटीपीसि के. माथनकर, नॅशनल थर्मल पॉवरचे महाप्रबंधक रमाकांत पंडा, मौदा येथील उपमहाप्रबंधक धर्मेंद्रकुमार प्रामुख्याने उपस्थित होते या श्रृखंलेत दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन 29 जुलैला साकोली येथील मनोहरभाई पटेल सभागृहात होणार आहे.

अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी ऊर्जा ही मनुष्याची मुलभूत गरज असून उर्जा विभागाचे कार्य समाधानकारक असल्याचे मत व्यक्त केले. देशातील खेड्यापाड्यात वीज विभागाचे जाळे पसरले आहे. 2047 पर्यत प्रत्येक घरात वीज जोडणीचे ध्येय आहे. उज्वल भारत हा स्तुत्य उपक्रम आहे. वीज पोहोचण्यात येणाऱ्या अडचणीवरही महावितरणने काम करावे. ग्राहकांनी ही वीज देयक वेळेत भरणा केले पाहीजे असेही श्री. जिभकाटे यावेळी सांगितले.

शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक उर्जा निर्मिती असली पाहीजे. पारंपरिक ऊर्जा स्त्रोतापेक्षा सौर ऊर्जा हे भविष्यातील भारताला प्रकाशमान करणारी ऊर्जा असेल, असे मत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी यावेळी व्यक्त केले. महावितरणचे वीज बिल नियमित भरण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ऊर्जा विभागाच्या माध्यमातून देशात मोठ्या प्रमाणात विकासाची ऊर्जा निर्माण झाली असून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहचविण्यासाठी प्रशासन कार्यक्षमतेने काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी महावितरणच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील लाभार्थ्याचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता राजेश नाईक यांनी केले. जिल्ह्यातील दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, सौभाग्य योजना, अटल सौर कृषी पंप योजनासह महावितरणच्या कार्याचा प्रगतीपर आढावा मांडला. देशाच्या प्रगतीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महावितरणचे वीज बिल नियमित भरणे ही एक प्रकारची देशसेवाच आहे, त्यामुळे वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन अधिक्षक अभियंता श्री. नाईक यांनी केले. यावेळी ऊर्जा विभागातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन मोनिका भेंडे व रोशन शेंडे यांनी केले. तर आभार अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी मानले. महावितरणचे अधीक्षक अभियंता व कार्यक्रमाचे नोडल अधिकारी राजेश नाईक व कार्यकारी अभियंता जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.