शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा 25 जुलै ते 23 ऑगस्ट या कालावधीत

शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा 25 जुलै ते 23 ऑगस्ट या कालावधीत

चंद्रपूर, दि. 21 जुलै : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (जीसीसी-टीबीसी) व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अँड स्टुडंट्स (जीसीसी- एसएसडी- सीटीसी) या दोनही परीक्षा दि. 25 जुलै ते 23 ऑगस्ट 2022 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने 281 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षांची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर संस्था लॉगिनद्वारे दि. 16 जुलैपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संबंधित संगणक टंकलेखन संस्थाचालकांनी त्यांच्या संस्थेतील सर्व परीक्षार्थींची प्रवेशपत्रे संकेतस्थळावरून डाऊनलोड करून शिक्का व स्वाक्षरीसह संबंधित परीक्षार्थींना वितरित करण्याची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येताना प्रवेशपत्रासोबत परीक्षा परिषदेने पुरविलेल्या नमुन्यातील स्वयंघोषणापत्र आणणे आवश्यक आहे. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे स्वतःचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, फोटो व सही बदल, तसेच विषय बदल हे फक्त त्या त्या विषयाचेच देण्यात येतील. जसे, इंग्रजी 30 असेल तर इंग्रजी 40, मराठी 30 असेल तर मराठी 40, व हिंदी 30 असेल तर हिंदी 40 इत्यादीबाबत दुरुस्ती असल्यास प्रत्येक चुकीस 200 रुपये शुल्क आकारण्यात येईल.

तसेच संस्थाचालकांनी प्रवेशपत्र निर्गमित झाल्यापासून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचा फोटो व ओळखपत्रासह समक्ष या कार्यालयात कार्यालयीन वेळेत येऊन प्रवेशपत्रावर सक्षम प्राधिकारी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांची सही व शिक्का घ्यावा, तरच संबंधित विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ट होता येईल. सर्व परीक्षार्थींनी त्यांचे ऑनलाइन प्रवेशपत्रे आपल्या संगणक टंकलेखन संस्थेतून परीक्षेपूर्वी हस्तगत करावी. परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती करून दिली जाणार नाही. याबाबत परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.