कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोस लसीकरण मोहीमेचे उदघाटन

कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोस लसीकरण मोहीमेचे उदघाटन

७५ दिवस निःशुल्क लसीकरण

चंद्रपूर १८ जुलै – चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोव्हीड लसीकरण अमृत महोत्सव अंतर्गत कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोस मोहीमेचे उदघाटन जिल्हाधिकारी श्री.अजय गुल्हाने व आयुक्त श्री. राजेश मोहीते यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ जुलै पासुन १८ वर्षावरील सर्वांच्या कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोसच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

पुढील ७५ दिवस चालणारी ही लसीकरण मोहिम निःशुल्क असुन कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेउन ६ महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या १८ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस घेता येणार आहे. मनपाच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण आवश्यक आहे. स्वत:च्या आरोग्यासह इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही लसीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि दुस-या डोसपासून सहा महिने पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र व्यक्तीने लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राजेश मोहीते यांनी केले आहे.

कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी झालेले असले तरी धोका मात्र टळलेला नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करून ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले त्यांना बुस्टर डोस देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारद्वारे घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर शहरातील बुस्टर डोससाठी पात्र प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणासाठी मनपाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

याप्रसंगी ११० व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात आला. मोहीम उदघाटनास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. अश्विनी भारत, डॉ. नयना उत्तरवार,डॉ. अतुल चटकी व आरोग्य कर्मचारी उपस्थीत होते.