कोरोना लसीकरणास सहकार्य करा शाळा महाविद्यालयांना सुचना

कोरोना लसीकरणास सहकार्य करा शाळा महाविद्यालयांना सुचना

चंद्रपूर ८ जुलै – कोरोना विषाणूचे स्वरूप दर वेळेस बदलत आहे, आज जरी रुग्णसंख्या कमी असली तरी दुर्लक्ष न करता विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्यास सहकार्य करण्याच्या सुचना अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी बैठकीत केल्या.

मनपा आरोग्य विभागामार्फत शाळकरी मुलांसाठी त्यांच्या शाळेतच लसीकरण करण्याची मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेस योग्य ते सहकार्य मिळावे या दृष्टीने शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक घेण्यात आली.

४ थ्या कोरोना लाटेच्या संभावित धोक्यात लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत शाळकरी मुलांसाठी त्यांच्या शाळेतच लसीकरण करण्याची मोहीम राबविली जात आहे. १२ ते १४ वयोगटासाठी कॉर्बीव्हॅक्स व १५ ते १७ वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सिन लस दिली जात आहे. सर्व शाळांनी लवकरात लवकर लसीकरण मोहीम राबवुन सहकार्य करण्याच्या सुचना याप्रसंगी देण्यात आल्या.

डेंग्युसंबंधी आवश्यक ती काळजी सावधगिरी बाळगण्यासाठी मनपा आरोग्य विभागामार्फत सर्व शाळांना स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड दिले जाणार आहे ज्यायोगे शाळकरी मुले आपल्या घरी डेंग्युविषयी जागृती करतील. मनपातर्फे दिल्या जाणाऱ्या या कार्डचा वापर शाळाप्रमुखांनी निश्चित करावा, शिक्षक पालक बैठकीत जागृती करावी व आपल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित करावे.

रेन वॉटर हार्वेस्टींग मोहीमेस सुद्धा शाळा महाविद्यालयांचे सहकार्य अपेक्षित आहे. आपल्या संस्थेत रेन वॉटर हार्वेस्टींग करावे. महानगरपालिकेतर्फे यासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल. शिक्षकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा. सहकार्य करणाऱ्या सर्व विद्यालय महाविद्यालयांना महानगरपालिकेतर्फे सन्मानीत केले जाणार आहे.या प्रसंगी सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.वनिता गर्गेलवार, डॉ.अतुल चटकी, सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थीत होते.