महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध – विद्युत वरखेडकर Ø कोविड-19 विषाणू व शेतकरी आत्महत्यामुळे मृत्यूमुखी झालेल्या व्यक्तींच्या विधवा महिलांचा संयुक्त मेळावा

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध – विद्युत वरखेडकर

Ø कोविड-19 विषाणू व शेतकरी आत्महत्यामुळे मृत्यूमुखी झालेल्या व्यक्तींच्या विधवा महिलांचा संयुक्त मेळावा

चंद्रपूर, दि. 8 जुलै : कोरोना माहामारीमुळे अनेक कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही हाणी कधीही भरून निघू शकत नाही. मात्र अशा कुटुंबाना सर्वोतोपरी मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे या महिलांच्या तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केले.

मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविड-19 विषाणूंमुळे व शेतकरी आत्महत्यामुळे मृत्यूमुखी झालेल्या व्यक्तींच्या विधवा महिलांचा मेळावा बल्लारपूर, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकताच घेण्यात आला. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ.दिप्ती सुर्यवंशी-पाटील उपस्थित होत्या.

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व विभागाने एक नोडल अधिकारी नियुक्त करून दर पंधरवाड्यात तहसीलदार यांनी आढावा घ्यावा, असे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिले. यावेळी त्यांच्या हस्ते आत्महत्या केलेल्या 3 शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदानाचे धनादेश वाटप करण्यांत आले. या मेळाव्यात शशिकांत मोकाशी, उद्योजकता स्किल्स ट्रेनर यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी शासनाने केलेल्या अनेक उपाययोजना व त्याचे फायदे याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या सर्व शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच विविध विभागाच्या अधिका-यांनी सुद्धा उपस्थित महिलांना मार्गदर्शन करीत विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

तहसील कार्यालय आणि महिला, बालकल्याण विभागाच्या वतीने आयोजित या मेळाव्याचे संचालन श्रीमती देवगडे यांनी तर आभार श्रीमती रोशनी यांनी मानले. यावेळी बल्लारपूर येथील गटविकास अधिकारी किरण धनवाडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गजानन मेश्राम, बालविकास प्रकल्प अधिकारी रमेश टेटे, रिना सोनटक्के, गट शिक्षणाधिकारी श्री. लामगे, सहाय्यक मुख्याधिकारी जयवंत काटकर, पोलिस निरीक्षक शैलेश ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी मामीडवार, नायब तहसीलदार सतीश साळवे, पुरवठा निरीक्षक प्रियंका खाडे, जिल्हा समन्वय अधिकारी अजय साखरकर आदी उपस्थित होते.