आदिवासी उमेदवारांकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन

आदिवासी उमेदवारांकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन

भंडारा, दि. 1 : स्पर्धा परिक्षेतील आदिवासी उमेदवारांना प्रोत्साहित करण्यासाठी स्पर्धा परीक्षा माहिती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे करण्यात आले आहे. या शिबिराचे पहिले सत्र 1 ऑगस्ट ते 15 नोंव्हेबर 2022 दरम्यान या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे. यासाठी आदिवासी जमातीमधील उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, शाळा सोडल्याचा दाखला व जातीच्या प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतीसह कौशल्य विकास कार्यालय, देवरी येथे अर्ज सादर करावे.

या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असावा. उच्च शैक्षणिक पात्रता धारकांसाठी टंकलेखन, संगणक, लघुलेखक परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य असणार आहे. उमेदवार हा आदिवासी जमातीचा असावा. उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण झालेले असावे. उमेदवार भंडारा किंवा गोंदिया जिल्ह्याचा रहिवासी असावा तसेच उमेदवाराने यापूर्वी या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा.

प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने पंधरा दिवस असेल. निवड प्राप्त उमेदवारांना देवरी जिल्हा गोंदिया येथे राहण्याची व्यवस्था स्वत:च करावी लागेल. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देय आहे. वरील अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी 25 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, मार्गदर्शन केंद्र देवरी यांनी कळविले आहे.