सेवानिवृत्त आणि दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत कायमस्वरूपी निवासस्थाने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्यासाठी समिती स्थापन

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड समितीचे अध्यक्ष तर गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील सह अध्यक्ष

मुंबई दि. 9 : मुंबईतील बी.डी.डी. चाळींमध्ये पोलीस विभागामार्फत पोलीस कर्मचाऱ्यांना जी सेवा निवासस्थाने दिलेली आहेत ती त्वरित रिकामी करून देण्याबाबत व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी तसेच दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत कायमस्वरूपी निवासस्थाने कशाप्रकारे उपलब्ध करून देता येतील, यावर उपायोजना सुचविण्यासाठी तसेच तद्नुषंगिक मुद्दयांबाबत सखोल अभ्यास करून शासनास सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील या समितीचे सहअध्यक्ष असतील तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील, अपर मुख्य सचिव (गृह), प्रधान सचिव (गृहनिर्माण), सह पोलीस आयुक्त (प्रशासन) मुंबई, मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ हे या समितीचे सदस्य असतील. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

मुंबईतील वरळी, नायगांव, ना. म. जोशी मार्ग, शिवडी येथील मुंबई विकास विभाग (बी.डी.डी.) चाळींचा पुनर्विकास जलद गतीने होण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २९ जून २०२१ रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निर्देश दिले होते.त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे.