जागतिक बालकामगार विरोधी दिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण

जागतिक बालकामगार विरोधी दिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण

चंद्रपूर, दि. 28 जून : जागतिक बालकामगार विरोधी दिवसाचे महत्त्व जिल्ह्यातील मुलांना व्हावे, याकरीता महिला विकास मंडळ द्वारा संचालित चाइल्ड लाईन, चंद्रपूर द्वारे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा धर्मपुरीवार, सरचिटणीस प्रभावती मुठाळ, संचालिका नंदा अल्लुरवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य व चाईल्ड लाईन चंद्रपुरची टिम प्रामुख्याने उपस्थित होती.

यावेळी क्षमा धर्मपुरीवार यांनी, बालकामगार वृत्तीला विरोध करून बालकामगार आढळल्यास बालकल्याण समिती, चंद्रपूर तसेच चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन केले. संचालिका नंदा आलूरवार यांनी संस्थेचे सदस्य व चाईल्ड लाईन टीम बाल कामगारांसाठी करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. तर संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती मुठाळ यांनी संस्था स्थापनेचा उद्देश व भविष्यकालीन वाटचालीबाबत उपस्थितांना माहिती दिली. जिल्ह्यात कोणतेही 0 ते 18 वर्षे वयोगटातील काळजी व संरक्षण संदर्भात गरज असलेली बालके आढळल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये विजेत्या व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, डायरी व पेन देऊन गौरविण्यात आले.