बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईनच्या सतर्कतेने बालविवाह रोखण्यात यश

बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईनच्या सतर्कतेने बालविवाह रोखण्यात यश

चंद्रपूर, दि. 28 जून : गोंडपिपरी तालुक्यात 16 वर्षाच्या बालिकेचा व 20 वर्षीय बालकाचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळताच त्या माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड लाईन व गोंडपिपरी पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेने व संयुक्त कार्यवाहीने सदर बालविवाह थांबविण्यात आला.

गोंडपिपरी तालुक्यातील एका गावात बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईन या यंत्रणेने गोंडपिपरी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली. पोलीस प्रशासनाने सदर गावात भेट देत बालविवाह थांबविण्याची कार्यवाही करत बालविवाह न करण्याचे आदेश दिले.

दुसऱ्या दिवशी चाईल्ड लाईन, आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी संयुक्तरीत्या विवाह स्थळी भेट दिली तसेच अल्पवयीन बालकाच्या व बालिकेच्या कुटुंबाचे समुपदेशन केले आणि बालविवाह न करण्यासंबंधी हमीपत्र लिहून घेण्यात आले.

सदर प्रकरणांमध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, महिला विकास मंडळाच्या सरचिटणीस प्रभावती मुठाळ, चाईल्ड लाईनच्या संचालिका नंदाताई अल्लुरवार, समन्वयक अभिषेक मोहुर्ले, संरक्षण अधिकारी सचिंद्र नाईक, पोलीस विभाग आदींचे सहकार्य लाभले.