कोविड-19 लसीकरण संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण करण्याकरीता स्थानिक कलावंताद्वारे जनजागृतीबाबत अर्ज आमंत्रित

कोविड-19 लसीकरण संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण करण्याकरीता स्थानिक कलावंताद्वारे जनजागृतीबाबत अर्ज आमंत्रित

गडचिरोली, दि.20: राज्यात कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहे. सदरचा संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी व त्याअनुषंगाने करण्यात येणारे लसीकरण याबाबत प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलावंताद्वारे समाजात जाणीव जागृती करण्याकरीता गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांची निवड करण्याकरीता अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे.

कोरोनाविषयक जाणीव जागृतीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसमारंभ, कमीत कमी व्यक्तींच्या उपस्थितीत धार्मिक बाबी, सण- उत्सव, प्रथा-परंपरा, कार्यक्रम, महोत्सव यांचे आयोन करताना शासनाचे कोरोना विषयक नियम पाळणे, मास्कचा वापर, साबणाचा वापर करुन वारंवार हात धुणे, वृद्ध व्यक्ती व लहान बालकांची काळजी, शासनाची कोरोना विषयक नियमावली, लसीकरण इत्यादी विषयक तसेच स्थानिक परिस्थिती व आवश्यकतेनुसार जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून सुचविण्यात आलेल्या विषयांवर कलाकारांनी आपापल्या कलेतून जाणीव जागृती करायची आहे.

कलावंत हा गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील कलावंतांनी या कार्यालयात अर्ज सादर करु नये. कोरोना लसीकरणबाबत जाणीव जागृतीसाठी वासुदेव, बहुरुपी इ. एकल कलाकारास एका दिवसासाठी जास्तीत जास्त रुपये पाचशे मानधन प्रती कलाकार देय राहील. एकल कलाकाराने किमान 3 सादरीकरण करणे अपेक्षित आहे. आणि दोन किंवा तीन कलाकारांच्या समूहास रोज कमीत कमी दोन सादरीकरण करणे आवश्यक राहील.

अधिक माहितीसाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे शासन निर्णय दिनांक 08 ऑक्टोबर 2021 नुसार कलावंतांनी शासन निर्णयाचे अवलोकन करावे. व त्यानुसारच अर्ज सादर करुन कार्य करण्यात यावे.

कलावंतांनी या आधी केलेले कार्यक्रमांचे वृत्तपत्रांचे कात्रणे, छायाचित्र व कार्यादेश अर्जासोबत जोडण्यात यावे. असे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी कळविले आहे.